‘Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-३’ मोहिमेत सुरक्षित लँडिंगवर भर | पुढारी

'Chandrayaan-3 : 'चांद्रयान-३' मोहिमेत सुरक्षित लँडिंगवर भर

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ या मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, याआधीच्या त्रुटी टाळून यानाच्या चंद्रावरील सुरक्षित लैंडिंगवर आमचा भर आहे. जुलैपर्यंत ‘चांद्रयान- ३’ लाँच केले जाईल, अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष तसेच अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस. सोमनाथ यांनी बुधवारी पत्र परिषदेत दिली.नागपुरातील सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने ते आलेले आहेत. ‘चांद्रयान- २’चा ऑर्बिटर ‘चांद्रयान- ३ मिशन’मध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. ‘चांद्रयान-३’ अगदी ‘चांद्रयान- २’ सारखेच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल वेगळे असेल आणि ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. ‘चांद्रयान-२’च्याच ऑर्बिटरची मदत तिसऱ्या मोहिमेत घेण्यात येणार आहे, असेही ” सोमनाथ यांनी सांगितले. (‘Chandrayaan-3 )

भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर, अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे, असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘इस्रो’चा प्रयत्न राहणार आहे. केंद्र सरकारही यासाठी अनुकूल आहे. असे केल्याने अंतराळ बाजारपेठेत स्पर्धा निर्माण होऊन अनेक नोकऱ्या निर्माण होतील, असे सोमनाथ यांनी सांगितले. बंगळूर येथे ‘इस्रो’च्या दुसऱ्या प्रक्षेपण केंद्राच्या बांधकामाचा आराखडा पूर्ण झालेला आहे. फक्त भूमि अधिग्रहण राहिले आहे. तेवढे झाले की, लगेचच बांधकाम सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.

‘Chandrayaan-3 : मानवरहित चाचण्यांनंतरच होणार ‘गगनयान’चे प्रक्षेपण

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘गगनयान मिशन’ची घोषणा केली होती. मुळात हे लक्ष्य २०२२ मध्ये साध्य करावयाचे होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. सहा महत्त्वपूर्ण मानवरहित चाचण्यांच्या यशस्वितेनंतरच मानवयुक्त यानाचे प्रक्षेपण करण्यात येईल. संपूर्णत: भारतीय तंत्रज्ञानाचा वापर ‘गगनयान’मध्ये असेल, असेही सोमनाथ म्हणाले.

हेही वाचा

Back to top button