Lakhimpur Kheri Violence : मृतांची संख्‍या ९ वर, केंद्रीय राज्‍यमंत्री मिश्रांच्‍या मुलावर खुनाचा गुन्‍हा | पुढारी

Lakhimpur Kheri Violence : मृतांची संख्‍या ९ वर, केंद्रीय राज्‍यमंत्री मिश्रांच्‍या मुलावर खुनाचा गुन्‍हा

उत्तर प्रदेशातील ( Lakhimpur Kheri Violence ) लखीमपूर खेरी येथे हेलिपॅडवर झालेल्‍या हिंसाचार प्रकरणातील मृतांची संख्‍या ९ झाली आहे. याप्रकरणी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्‍या मुलगा आशीष मिश्रा याच्‍यावर खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. आंदोलक शेतकर्‍यांवर गाडी घालून त्‍यांची हत्‍या केल्‍याचा आरोप त्‍याच्‍यावर आहे.  हिंसाचारानंतर बेपत्ता असणार्‍या पत्रकाराचाही मृतदेह आज मिळाल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

अभिषेक मिश्राने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घातल्‍याने हिंसाचाराचा भडक

केंद्रीय गृहराज्‍य मंत्री अजय मिश्रा टेनी आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडवर शेतकर्‍यांनी रविवारी सकाळपासून कब्जा केला होता. दुपारी पावणेतीन वाजता दोन्ही नेत्यांचा काफिला तिकोनिया चौकातून गेला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेऊन त्यांच्या दिशेने धावून आले. केंद्रीय मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा ऊर्फ मोनू याने आपली गाडी शेतकर्‍यांच्या अंगावर घातली.

यामुळे शेतकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाला. ( Lakhimpur Kheri Violence ) शेतकर्‍यांनी आशीष यांच्या गाडीसह अनेक गाड्यांची जाळपोळ, तोडफोड सुरू केली.  काही गाड्या पेटवण्यात आल्या. ( Lakhimpur Kheri Violence )  या हिंसाचारात तिघांचा मृत्‍यू झाला होता. तर संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तजिंदरसिंग विर्क यांच्‍यासह ८ जण गंभीर जखमी झाले होते. सोमवारी हिंसाचारातील मृतांचा आकडा ९ झाला .

प्रियांका गांधींना पोलिसांकडून धक्‍काबुक्‍कीचा काँग्रेसचा आरोप

लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी लखनौ येथे धाव घेतली. लखीमपूर दौर्‍यासाठी निघाल्‍यानंतर आज ( दि. ४ ) पहाटे साडेपाच वाजता सीतापूर जिल्‍ह्यातील हरगाव येथे त्‍यांना पाेलिसांनी ताब्‍यात घेतले. यावेळी प्रियांका गांधींना महिला पोलिसांनी धक्‍काबुक्‍की केली. त्‍यांचा हात मुरडला असा काँग्रेसचा आरोप केला.

प्रियांका गांधी यांनी पोलिसांना घेतले फैलावर

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना सीतापूर जिल्‍ह्यातील हरगाव येथे पोलिसांनी ताब्‍यात घेतले.

या कारवाईमुळे प्रियांका गांधी संतप्‍त झाल्‍या. मलाही कायदा माहित आहे. “चुकीच्‍या पद्‍धतीने कारवाई कराल तर तुमच्‍याविरोधात अपहरणाचा प्रयत्‍न, विनयभंग, जिविताला धोका निर्माण होईल आदी कलमांन्‍वये गुन्‍हा दाखल होईल. तुम्‍ही तुमच्‍या मंत्री व अधिकार्‍यांकडून वॉरंट घेवून या. महिला पोलिसांची ढाल करुन येथे धक्‍काबुक्‍की करु नका. येथे तुम्‍ही म्‍हणाल तो कायदा चालणार नाही. मला कोणत्‍या आदेशान्‍वये थांबविण्‍यात आले आहे”, अशा शब्‍दात प्रियांका गांधी यांनी पोलिसांना फैलावर घेतले.

यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्‍यांना ताब्‍यात घेण्‍याचे देश दिले.

अखिलेश यादव यांचे निवासस्‍थानाबाहेर ठिय्‍या आंदोलन

समाजवादी पार्टीचे अध्‍यक्ष अखिलेश यादव यांनाही आज लखीपूरला जाणार असल्‍याचे म्‍हटले होते.

त्‍यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

साेमवारी सकाळी अखिलेश यादव यांनी आपल्‍या निवासस्‍थानाबाहेरच ठिय्‍या आंदोलन केले.

याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे.

मिश्रा यांच्‍या राजीनाम्‍यानंतर मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार : टिकैत

भारतीय किसान परिषदेचे प्रवक्‍ता राकेश टिकैत यांनीच लखीमपुरा जाण्‍याची परवानगी मिळाली.

ते रात्री लखीमपूरमधील तिकुनिया येथे पोहचले.

त्‍यांनी घटनास्‍थळाची पाहणी केली.

या प्रकरणी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशीष मिश्र मोनू याला अटक करण्‍यात यावी.

अजय मिश्रा मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत मृतेदहांवर अंत्‍यसंस्‍कार केले जाणरा नाहीत, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

हीही वाचलं का ?

 

 

Back to top button