इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : हनीट्रॅप च्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे बदनामी करण्याची धमकी दिल्याच्या दबावामुळे चंदूर (ता.हातकणंगले) येथील शाहूनगर परिसरात राहणार्या संतोष मनोहर निकम (वय 35) या यंत्रमाग कामगाराने रविवारी गळफास घेवून आत्महत्त्या केली.
पोलिस व नातेवाईकांनी मोबाईलची पडताळणी केल्यानंतर हनीट्रॅप चा प्रकार पुढे आला. हनीट्रॅप चा हा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचीही चर्चा आहे. संतोष याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे. आत्महत्त्येच्या घटनेची नोंद इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
चंदूर येथील शाहूनगर परिसरात राहणारा संतोष हा यंत्रमागावर काम करीत होता. रात्रपाळी केल्यामुळे तो घरातील खोलीत झोपला होता. सायंकाळी 7 च्या सुमारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे नातेवाईकांसह नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी आत्महत्त्येचा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. पोलिस व नातेवाईकांनी त्याच्या मोबाईलची पडताळणी केली. त्यावेळी हनीट्रॅप चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांपासून हरियाणा येथील नेहा शर्मा नामक तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष याच्याशी संपर्क केला. या माध्यमातून दोघांमध्ये व्हिडीओद्वारे संवादही सुरू होता.
या तरुणीने स्वत:अश्लील चाळे करीत संतोषला आपल्या जाळ्यात अडकवले. तसेच अश्लील कृत्ये करण्यासही प्रवृत्त केले. याचा व्हिडीओ तिने रेकॉर्ड केला. यातूनच तरुणीने पैशांची मागणी सुरू केली. दहा हजार रुपयांची मागणी केल्याची चर्चा होती. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर दोन हजारासाठी तिने तगादा लावत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आपण हनीट्रॅप मध्ये फसल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष नैराश्यात होता. त्यातूनच त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची चर्चा होती. या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून चौकशी सुरू केली आहे. घटनेची वर्दी मनोहर निकम यांनी दिली आहे.