इंडेक्स फंड : भारतीयांना परदेशी शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी

इंडेक्स फंड : भारतीयांना परदेशी शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी
Published on
Updated on

इंडेक्स फंड हा इक्विटी फंडांचाच प्रकार आहे आणि त्यामधील गुंतवणूकही इक्विटीमध्येच होते. परंतु इक्विटी फंडांमध्येही Active Funds आणि Passive Funds असे दोन उपप्रकार आहेत. अ‍ॅक्टिव्ह फंडांमध्ये फंड मॅनेजर कार्य करतात आणि ते कंपन्यांची निवड करून त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. पण पॅसिव्ह फंडांमध्ये असे होत नाही.

बदलत्या काळाबरोबर गुंतवणुकीची मानसिकताही बदलायला हवी. 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' अशी पारंपरिक, नियतीशरण मानसिकता तशीच ठेवायची असेल तर महागाई दरापेक्षा कमी मिळणार्‍या बँकांच्या व्याजदरांवर उत्पन्न देणार्‍या बाँडस्मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

पण मग शंभरी ओलांडलेल्या पेट्रोल दराचा सामना कसा करणार? दरवर्षी 20 टक्के महाग होणार्‍या औषधांचे काय करणार? गगनाला भिडू पाहणार्‍या खाद्यतेल आणि डाळींच्या वापरात किती काटकसर करणार? अतिदक्षता माणसाच्या एकूणच जीवनाचा संकोच करते, त्याचे पंख छाटून टाकते. गुंतवणुकीच्या बाबतीत तरी हे शंभर टक्के सत्य आहे. In investing what is comfortable is raely profitable हे अमेरिकन गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट अरनॉट यांचे वचन सुप्रसिद्ध आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा आवाका वाढवायला हवा. ती काळाची गरज आहे.

मध्यम ते दीर्घ कालावधीत इक्विटीमधील गुंतवणूकच फक्त महागाई दरावर मात करणारा परतावा देऊ शकते, हे काळाच्या कसोटीवर उतरलेले सत्य आहे. इक्विटीत गुंतवणूक करायची आहे आणि त्यातही आपल्या गुंतवणुकीचा आवाका वाढवायचा आहे, तर काय करायला हवे? यावर उपाय म्हणजे आपण ग्लोबल फंडांमध्ये गुंतवणूक करायला हवी. परंतु ग्लोबल इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करूनही आपण कमी प्रमाणात का होईना; परंतु त्यामधील जोखीम कमी करू शकतो का? तर त्यावरही उपाय आहे. आपण ग्लोबल इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करायला हवी.

इंडेक्स फंड हा इक्विटी फंडांचाच प्रकार आहे आणि त्यामधील गुंतवणूकही इक्विटीमध्येच होते. परंतु इक्विटी फंडांमध्येही Active Funds आणि Passive Funds असे दोन उपप्रकार आहेत. अ‍ॅक्टिव्ह फंडांमध्ये फंड मॅनेजर कार्य करतात आणि ते कंपन्यांची निवड करून त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. पॅसिव्ह फंडांमध्ये असे होत नाही. तिथे त्यांचा जो बेंचमार्क इंडेक्स असतो. त्या इंडेक्समधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये इंडेक्सच्या टक्केवारी प्रमाणेच गुंतवणूक होते.

अ‍ॅक्टिव्ह फंडांप्रमाणे इथे शेअर्सची वारंवार खरेदी विक्री होत नाही. आता ग्लोबल फंड म्हणजे काय, हे आपण मागील एका लेखात पाहिलेच आहे. जेव्हा एखादा फंड आपल्या मातृदेश सोडून अमेरिका आणि जगातील इतर एक किंवा अनेक शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तेव्हा तो ग्लोबल होतो. त्याचबरोबर अशा फंडाची गुंतवणूक प्रत्यक्ष परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये न होता इंडेक्समध्ये होते तेव्हा ते ग्लोबल इंडेक्स फंड बनतात.

इंडेक्स फंडांचे अतिशय आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा व्यवस्थापन खर्च अतिशय कमी असतो. कारण त्यामध्ये फंड मॅनेजर आणि त्याची टीम कार्यरत नसते. सर्वसाधारणपणे तो एक टक्क्याच्याही खाली असतो. परिणामी अंतिमतः गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळतो.

अमेरिकेतील S&P आणि Dow Jones या इंडायसेसकडून दर सहा महिन्यांनी अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंडांची तुलनात्मक कामगिरी प्रसिद्ध होते. या रिपोर्टनुसार 2020 पर्यंत सलग 10 वर्षे अमेरिकेतील इंडेक्स फंडांनी अ‍ॅक्टिव्ह फंडापेक्षा दमदार कामगिरी करून बेंचमार्क इंडेक्सपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

आता आपण ग्लोबल फंडाचे काही फायदे पाहू. Extensive Diversification हा सर्वात पहिला ठळक फायदा. आपण आपल्याच देशातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, तर आपली जोखीम खूप कमी होते. प्रत्येक देशाचे आर्थिक चक्र (Economic Cycle) वेगळे असते. त्यामुळे एखाद्या कालावधीत एका देशात मंदी असेल तर दुसर्‍या देशात तेजी असू शकते.

"Efficient risk – reward ratio" हा ग्लोबल फंडांचा ठळक फायदा असतो. मागील दशकामध्ये निफ्टीने 10.74 टक्के सरासरी परतावा दिला आहे. याउलट 70ः30 या प्रमाणामध्ये निफ्टी 50 आणि MSCI World या इंडायसेसमध्ये गुंतवणूक असणार्‍या ग्लोबल इंडेक्स फंडांनी 12.29 टक्के परतावा दिला आहे.

भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये पारंपरिक क्षेत्रांचा उदा. माहिती – तंत्रज्ञान, बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑईल अँड गॅस या क्षेत्रांचा वरचश्मा आजही आहे. परंतु तुम्हाला बदलत्या आणि आधुनिक Trends चा लाभ उठवायचा असेल (उदा. पेमेंट्स, ई कॉमर्स, रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, इंडस्ट्रीअल ऑटोमेशन, ब्लॉक चेन) तर तुम्हाला ग्लोबल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याशिवाय गत्यंतर नाही.

Dollar rate appreciation हा ग्लोबल फंडांचा सर्वात मोठा आणि खात्रीशीर फायदा आहे. 2010-11 या वर्षात एका डॉलरचा दर 46 ते 49 रु. एवढा होता. तो 2020-21 मध्ये रु. 73-75 इतका झाला. सामान्यतः दरवर्षी 4 ते 5 टक्के दराने डॉलरच्या भावात रुपयाच्या तुलनेने वृद्धी होते. म्हणजे फंडाची कामगिरी सोडून आपल्या ग्लोबल फंडामधील गुंतवणुकीत 4 ते 5 टक्के वाढ आपसूकच होते.

ग्लोबल इंडेक्स फंडांचे वरील लाभ पाहिले, तर गुंतवणुकीच्या या क्षेत्रातही भारतीयांनी पाय रोवण्यास सुरुवात केली पाहिजे. आयसीआयसीआय पुडेन्शिअलने 27 सप्टेंबर 2021 रोजी Nasdaq 100 Index Fund बाजारात आणला आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत तो खुला राहील. शिवाय HDFC म्युच्युअल फंडानेही HDFC Developed World Index Fund हा एक Unique Global Index Fund 17 सप्टेंबर रोजी सुरू केला आहे. या दोन्ही फंडांची विस्तृत माहिती आपण पुढील सोमवारी घेऊ.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news