कॅलिफोर्निया तील महिलेला सापडला दुर्मीळ हिरा | पुढारी

कॅलिफोर्निया तील महिलेला सापडला दुर्मीळ हिरा

कॅलिफोर्निया : अमेरिकेत पार्कमध्ये फिरण्यासाठी आलेल्या महिलेला पिवळ्या रंगाचा एक दुर्मीळ हिरा सापडला आहे. अरकान्ससच्या ‘डायमंड स्टेट पार्क’मध्ये ही घटना घडली आहे.

कॅलिफोर्निया तील ग्रेनेटी बी येथे राहणारी नूरीन ब्रेडबर्ड ही माहिला पार्कमध्ये निवांत बसली असता तिला तो हिरा सापडला. दरम्यान, अरकान्सस स्टेट पार्कच्या अधिकार्‍यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून नूरीनला 4.38 कॅरेटचा हिरा सापडला असल्याची माहिती दिली. या पार्कमध्ये मिळालेल्या अलीकडच्या हिर्‍यांपैकी हा सर्वाधिक महागडा आहे. या दुर्मीळ पिवळ्या हिर्‍याची किंमत इतकी असू शकते की, अंदाज लावणेही अवघड आहे.

नूरीनला सापडलेल्या या दुर्मीळ हिर्‍याचा आकार जैलीबिन कँडीइतका आहे. पार्कचे अधीक्षक कॅलेब हॉवेल यांनी सांगितले की, ज्यावेळी मायक्रोस्कोपने हा हिरा पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो अत्यंत सुंदर व आकर्षक रंगाचा असल्यासारखा वाटला. नूरीन ही आपला पती मायकलसोबत अरकान्सस हे राज्य फिरण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने डायमंड पार्कमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. पार्कमध्ये 40 मिनिटे फिरल्यानंतर नूरीनला एक पिवळ्या रंगाचा दगड दिसून आला.

तेव्हा तिला हा हिरा असू शकेल, असे वाटले नव्हते; पण तो अत्यंत स्वच्छ आणि चमकदार होता. या दाम्पत्याने या हिर्‍याचे नाव ‘लूसिज डायमंड’ असे ठेवले आहे. लूसी हे त्यांच्या मांजराचे नाव आहे. या डायमंड पार्कमध्ये येणार्‍या लोकांना 1972 पासून ते आतापर्यंत 33,100 हिरे मिळाले आहेत. यातील एक हिरा 40.23 कॅरेटचा आहे.

Back to top button