काका-पुतण्याच्या वादात लोजपाचे निवडणूक चिन्ह गोठवले | पुढारी

काका-पुतण्याच्या वादात लोजपाचे निवडणूक चिन्ह गोठवले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :

चिराग पासवान आणि पशुपति पासवान यांच्या भांडणात आता लोक जनशक्ती पार्टीचे ‘घर’ हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे ( लोजपाचे निवडणूक चिन्ह गोठवले ).

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पासवान यांच्यातील चिन्हावरील वारसा लढाईला तूर्तात पूर्णविराम दिला आहे.

सध्या बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुका लागल्या आहेत.

आयोगाच्या या दणक्यामुळे दोन्ही गटांना वेगळ्या निवडणूक चिन्हावर लढावे लागणार आहे.

सध्या दोन जागांसाठी निवडणूक लागली असून तेथे लोकजनशक्ती पक्षाचा अधीकृत उमेदवार कोण असेल यावरून वाद सुरू होता.

चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर आल्यानंतर आयोग तीन पर्यायांवर विचार करत होते.

यातील पहिला पर्याय होता की, अंतिम निर्णय होईपर्यंत पक्षाचे चिन्ह गोठवणे आणि दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढविण्यास सांगणे.

दुसरा निर्णय असा की, चिराग पासवान यांना अधीकृत पक्षाचे चिन्हा बहाल करणे आणि तिसरा निर्णय म्हणजे पशुपती पारस यांच्या गटाला निवडणूक चिन्ह देणे.

या तिन्ही पर्यायातील पहिला पर्याय निवडणूक आयोगाने स्वीकारत निर्णय जाहीर केला.

चिराग पासवान यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेट देऊन लोक जनशक्ती पक्षाचे चिन्ह त्यांच्या गटाला द्यावे, अशी विनंती केली होती.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पक्षात उभी फूट पडली असून चिराग पासवान आपलाच गट पक्षाचा अधीकृत भाग असल्याचा दावा करत आहेत. तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री पशुपती पारस करत आहेत.

रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पशुपती पारस यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे घोषित केले होते. ( लोजपाचे निवडणूक चिन्ह गोठवले)

काका- पुतण्यात वाद

रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्रिमंडळात अन्नधान्य पुरवठा मंत्री होते. भाजपशी त्यांनी युती केल्याने त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे लक्ष लागले होते. रामविलास यांचे भाऊ पशुपति यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे जाहीर केले होते. हा चिराग पासवान यांना मोठा धक्का होता. तेव्हापासून काका आणि पुतण्यात मोठा वाद सुरू होता.

हेही वाचा : 

 

Back to top button