बबनराव पाचपुते संतप्त, प्रोटोकॉल न पाळल्याने अधिकार्‍यांवर नाराज | पुढारी

बबनराव पाचपुते संतप्त, प्रोटोकॉल न पाळल्याने अधिकार्‍यांवर नाराज

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व विस्तारित कोविड इमारतीच्या उदघाटन पत्रिकेत नाव खाली टाकल्याने आ. बबनराव पाचपुते संतप्त झाले. पाचपुते यांनी अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता त्यांची बोलती बंद झाली. दरम्यान मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात  विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा बबनराव पाचपुते यांनी दिला.

श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व विस्तारीत कोव्हिड इमारतीचे उदघाटन आज शनिवारी (दि.२) रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती.

त्या निमंत्रण पत्रिकेत बबनराव पाचपुते यांचे नाव पत्रिकेत खाली टाकण्यात आले होते.

ही बाब पाचपुते यांना चांगलीच खटकली.

कार्यक्रमादरम्यान पाचपुते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? असा सवाल केला.

मी सात वेळा आमदार पद भूषविले आहे. आम्ही काही बोलत नाही याचा तुम्ही गैरफायदा घेणार का? असे संप्तत प्रतिक्रीया त्‍यांनी दिली.

अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असून कार्यक्रम पत्रिका तयार करताना शिष्टाचार कसा पाळायचा हे समजायला पाहिजे. शिष्टाचार न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button