आंबा व काजू पिकांवरील कीड, रोग व्यवस्थापनासाठी 'हॉर्टसॅप' प्रकल्प - पुढारी

आंबा व काजू पिकांवरील कीड, रोग व्यवस्थापनासाठी 'हॉर्टसॅप' प्रकल्प

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा: आंबा व काजू फळ पिकांकरिता क्रॉपसॅप योजनेंतर्गत कीड व रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापनासाठी हॉर्टसॅप प्रकल्प कोकण विभागातील ठाण्यासह पाच जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांमध्ये १ ऑक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात झाली आहे, माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.

क्रॉपसॅप योजनेंतर्गत फळ पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन हॉर्टसॅप प्रकल्प यावर्षी राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत आंबा व काजू पिकांकरिता कोकण विभागातील क्षेत्रीय अधिकारी- कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले.

त्यामाध्यमातून फळपिकांवरील कीड व रोगांची ओळख, नियंत्रणाच्या उपाययोजना तसेच हवामानातील बदल व अवेळी पावसामुळे होणाऱ्या कीड व रोगाचा प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी मादर्शन करण्यात आले.

अकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादन घट हाेते.

याचा विचार करता  प्रभावी जलद उपाययोजना होण्याच्या दृष्टीने प्रमुख फळपिकांसाठी हॉर्टसॅप ही योजना राबवण्यात येत आहे.

राष्ट्रीय एकात्मिक किड व्यवस्थापन, केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली कृषी विद्यापीठे, विविध संशोधन केंद्र व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्या समन्वयातून योजनेचे काम केले जात आहे.

यासाठी किमान ५०० आणि जास्तीत जास्त २००० हेक्टर क्षेत्रासाठी एक कीड सर्वेक्षक- कृषी पर्यवेक्षक आहेत.

ते  गावातील निश्चित केलेल्या प्लॉट व रँडम प्लॉटमधून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी सर्वेक्षण करून पिकांची अवस्था व कीड रोगाची निरीक्षणे करून अहवाल नोंदवतात.

कीड नियंत्रक – कृषी अधिकारी या नोंदी योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करतात.

कीड, रोग आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषी विद्यापीठामार्फत त्यावर मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायझरी) पाठविण्यात येतात. त्यानुसार कीड व रोगाचे नियंत्रणाचे उपाय केले जातात.

विभागातील फळ पिकांबद्दल तांत्रिक माहिती व कीड रोगाबद्दल मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्रावर शेतीशाळा आयोजित केल्या जातात.

कोकण विभागात आंबा फळपिकाच्या एकूण ३६ व काजू करिता २१ शेती शाळा  आहेत.

यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.

याचाच भाग म्हणून आज प्रशिक्षण आयोजित केले होते.

त्यात काजू पिकावरील कीड व रोगाबाबत डॉ. बी. डी. शिंदे, डॉ. एस. एस. जोशी, डॉ. एस. के. मेहंदळे, डॉ. एस. पी. सणरा. डॉ.एम.बी.दळवी, डॉ.जी.एम. गोळवणकर, व्ही. एस. देसाई, शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button