नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार | पुढारी

नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली,पुढारी ऑनलाईन : बेकायदा घरात डांबून ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी त्यांना बेकायदा घरात डांबून ठेवून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.

याविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल केली.

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकाराचा वापर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

नांगरे-पाटील यांनी पदाचा गैरवापर केला

नांगरे-पाटील यांनी घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असून आपल्याला घरात ६ तास डांबून ठेवल्याचे सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर सोमय्या यांनी कागल तालुक्यातील मुरगूड येथे येऊन तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते.

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा निश्चित केला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी बंदोबस्त पुरविण्यास असमर्थता दर्शवित सोमय्या यांना कोल्हापूर बंदी केली. त्या दिवशी सोमय्या यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपल्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले होते.

गेल्या सहा तासांपासून आपण घरातून बाहेर पडू शकलो नाही, असे सांगत त्यांनी पोलिसांवर दंडेलशाहीचा आरोप केला होता. या सर्व प्रकारामागे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हेच असल्याचा आरोप केला होता.

सोमय्यांना कोल्हापूरला येत असताना रोखले

सोमय्या हे कोल्हापूरला येत असताना त्यांना सीएसटी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रोखले होते. तसेच त्यांना आदेश दाखवून कोल्हापूरला जाता येत नसल्याचे सांगितले. सोमय्या यांनी आपल्याला असे रोखता येणार नसल्याचे सांगत दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते .त्यानुसार ते कोल्हापूरला रवाना झाले. मात्र, त्यांना कराड येथे पोलिसांनी उतरवले.

दरम्यान कोल्हापुरात राष्ट्रवादीचे कार्यक्रर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी सोमय्या यांचा विरोध करत कोल्हापुरात आल्यास जशास तसे उत्तर देऊ असे सांगितले होते.

हेही वाचा : 

Back to top button