किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा दावा : हसन मुश्रीफ | पुढारी

किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा दावा : हसन मुश्रीफ

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकास विभागात दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप बिनबुडाचा आणि त्यांच्या अकलेची कीव आणणारा आहे, असे स्पष्ट करताना सोमय्या यांनी सारखे खोटेनाटे आरोप करणे थांबवून माफी मागावी. नाहीतर अब्रुनुकसानाच्या दाव्यास सामोरे जावे, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिला आहे.

किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानाचा दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांना नोटीसही दिली आहे. त्यांनी नोटीस घेतली नाही असे हसन मुश्रीफ म्हणाले.

ग्रामविकास विभागाच्या जीएसटी-टीडीएस भरण्यासाठी नेमलेल्या मे जयस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला दिलेल्या कंत्राटामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप तथ्यहिन व बिनबुडाचा आहे. आजपर्यंत या कंपनीला एकही ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने करार करून काम दिले नाही की या कंपनीला आतापर्यंत एकाही पैशाचे देयक प्रदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी दीड हजार कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा लावलेला शोध कीव करण्यासारखा आहे, असे ते म्हणाले.

ग्रामपंचायती, पंचायत समितीमार्फत कंत्राटदारास देण्यात आलेल्या जीएसटीचा भरणा ठेकेदार करत नसल्याने शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. म्हणून विविध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शासन स्तरावर सर्वसमावेशक व समान दर ठरवावे, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने जीएसटी, टीडीएस प्रणालीवर जीएसटी भरणे व रिटर्न दाखल करणे यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्तीप्रमाणे एकूण चार निविदा प्राप्त झाल्या होत्या.

त्यातील कमी दराच्या निविदेला मान्यता देण्यात आली. मे. जयस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम दिले असले तरी देखील सदर बाब ही पूर्णतः ऐच्छिक होती. या कंपनीपेक्षा कोणी कमी दराने काम करत असेल तर त्यांच्याकडून काम करून घेण्याची मुभा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

माझा आवाज दाबू शकणार नाही

बिनबुडाचे आरोप करून मला टार्गेट केले जात आहे. पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा असे सातत्याने आरोप होत आहेत. रजिस्ट्रर अ‍ॅक्ट ऑफ कंपनीमध्ये आपण जी कागदपत्रे सादर करतो ती कागदपत्रे त्यांनी दिली आहेत. मला टार्गेट करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दौर्‍यावर गेले आहेत याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता, मी कार्यकर्त्याना शांततेचे आवाहन केले आहे. अन्यथा उगाचच त्यांना प्रसिध्दी मिळते. पण ते अति करीत आहेत. त्यांनी अति करू नये. पूर्वीही त्यांना हेच सांगितले आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

Back to top button