

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अमरिंदर सिंग यांनी तुर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, मात्र, काँग्रेसमध्येही राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
'आतापर्यंत मी काँग्रेसमध्ये आहे, पण मला ज्याप्रकरची वागणूक दिली जात आहे, ते पासून मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ५० वर्षांनंतर माझ्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जात आहे. हे सहन करण्यापलिकडचे आहे.' असे सिंग म्हणाले.
बुधवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली.
अमरिंदर सिंग यांनी काही कागदपत्रे डोवाल यांच्याकडे सुपूर्द केली आहेत, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
मात्र, ही कागदपत्रे कशासंदर्भात आहेत हे मात्र, कळू शकले नाही.
पंजाबमध्ये सत्ताबदलानंतर काँग्रेसमधील गृहकलह शांत होईल असे वाटत होते.
मात्र, चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री करून प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे पख कापल्याने सिद्धूने राजीनामा दिला आहे.
त्यांच्या समर्थनार्थ मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि अन्य काही सहकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात होते.
मात्र, या शक्यता खोडून काढत आपण काँग्रेसमध्ये राहणार नाही हे नक्की, पण तूर्तास भाजपमध्ये जाणार नाही हेही खरे आहे. असे ते म्हणाले.
पंजाबमध्ये कृषी कायद्यांवरून भाजपविरोधात वातावरण आहे.
त्यामुळे तो रोष कमी करण्यासाठी अमरिंदर सिंग जर भाजपात दाखल झाले तर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे.
त्यांच्याकडे केंद्रीय कृषीमंत्रिपद द्यायचे अशी खेळी भाजप खेळू शकते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरिंदर सिंग हे भाजपच्या फायद्यात पडून शकतात, अशाही चर्चा आहेत.
पंजाबमध्ये अमरिंदर सिंग हे भाजपचा चेहरा असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते विधानसभा निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे. अमरिंदर सिंग – अमित शहा भेट हा त्यामागचा भाग असल्याचे बाोलले जात आहे.
सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक जिंकू देणार नाही, असा इशारा या भेटीनंतर कॅप्टन अमरिंदर यांनी दिला. अशात भाजप पंजाबमध्ये राजकीय जमीन तयार करण्यासाठी कॅप्टन आणि सिद्धूच्या भांडणाचा राजकीय वापर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये सामिल व्हायचे की नाही, याचा सर्वस्वी निर्णय भाजप श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर यांच्यावर सोडला आहे. कॅप्टन भाजपमध्ये सामिल झाले नाही, तर आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्ररित्या कॅप्टनला मदत पुरवू शकते, असे बोलले जात आहे. तुर्त, पंजाबच्या अनुषंगाने भाजपमध्ये मोठी तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
कॅप्टन यांचा बंडात्मक पवित्रा शांत करण्याची जबाबदारी पक्षाच्या जेष्ठ नेत्या अंबिका सोनी तसेच कमलनाथ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पंरतु,याचा फार विशेष असा फायदा होतांना दिसून येत नाही. अमरिंदर सिंह दिल्लीत काँग्रेसचे 'जी-२३' गटाच्या नेत्यांसोबत संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. राजधानीतील पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसाठीचे निवासस्थान देखील कॅप्टन यांनी खाली केले आहे. बुधवारी कॅप्टन अमरिंदर यांनी अमित शहा यांची भेट घेवून शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दयांवर चर्चा केली. उभय नेत्यांनी शेती सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनासंबंधी चर्चा केली. लवकरात लवकर शेती सुधारणा कायदे मागे घेऊन एमएसपी कायदा लागू करण्याची विनंती कॅप्टन यांनी शहांकडे केली, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागारांनी दिली होती. पंरतु, कॅप्टन यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान झालेल्या शहा आणि डोभाल यांच्यासोबतच्या भेटीतून नेमके काय साध्य झाले? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :