Aurangabad rain update : १२ तास दमदार पावसामुळे औरंगाबाद शहर पाण्याखाली

Aurangabad rain update : १२ तास दमदार पावसामुळे औरंगाबाद शहर पाण्याखाली
Published on
Updated on

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : मागच्या आठवडाभरापासून शहरात पावसाचे सातत्य सुरु आहे. दरम्यान काल सोमवार (दि. २८) रात्री ११ वाजता सुरु झालेल्या दमदार पावसाने औरंगाबाद शहराला सलग १२ तास झोडपून काढले. मध्यरात्री तीन वाजता पावसाने रौद्ररुप धारण केल्यामुळे रात्रीपासूनच शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. (Aurangabad rain update)

मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील खाम नदीलाही पूर आल्याने परिसरातील वसाहतींमधील घरात पाणी शिरले. शहर परिसरात असलेला हर्सूल तलावही या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ४५.१ मिलिमीटर नोंद झाली आहे.

या पावसामुळे शहराच्या सखल भागात असलेल्या वसाहती तसेच इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. यामध्ये औरंगपूरा परिसर, दलालवाडी, उल्कानगरी, कैलासनगर, एन ७, मोंढा परिसर, हिलाल कॉलनी या भागामधील घरांमध्ये पाणी शिरले, दलालवाडी परिसरात नाल्याचे काम सुरु असल्यामुळे या नाल्यातून पाणी बाहेर आल्याने परिसरातील बहुतांश घरामध्ये पाणी शिरले. नाल्यातून नागरी वसाहतीत येणाऱ्या पाण्याचा वेगही मोठा होता.

Aurangabad rain update : पावसबरोबर वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान

शहरात पावसासोबतच वाऱ्याचा वेगही मोठा होता यामुळे अनेक दुकानांवर बोर्ड हवेत उडाले.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन समोरील भागामध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्याने या भागाला नदीचे स्वरुप आले.

राजनगर, तारांगणनगर, शिवसाईनगर या वसाहतीमध्येही पाण्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली.

महानगरपालिका मुख्यालयाची टप्पा क्रमांक ३ इमारतीच्या आवारात झाड कोसळल्याने इमारतीमध्ये जाण्याचा रस्ता बंद झाला, हे झाड आवारात उभ्या असलेल्या वाहनांवर पडल्याने येथील वाहनांचेही मोठे नुकसान झाले.

मुख्यालय इमारतीच्या मागे असलेल्या जुनाबाजार भागातील कब्रस्तानातील झाड कोसळून रस्त्यावर पडल्यामुळे दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

पालिकेचे मदतकार्य सुरु

महापालिकेच्या मुख्यालयालाच आपत्तीचा सामना करावा लागला असल्याने तत्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले, या ठिकाणी उद्यान विभाग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. यावेळी रस्त्यावरील झाडे बाजूला करुन वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

अर्धा तास ढगफुटीपेक्षा अधिक वेग

पहाटे तीन वाजेच्या सुमारास पावसाचा वेग अचानक वाढला, त्यावेळेस शहरातील एमजीएम, जेएनईसी वेधशाळेत पावसाचा वेग ११०.७ मिमी प्रतितास मोजला गेला, यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजून ५१ मिनिट ते ११ वाजून २१ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत ढगफुटीपेक्षा अधिक वेगाने पाऊस झाला, ११ तासात एमजीएम जेएनईसी वेधशाळेत ९८.३ तर एमजीएम गांधेली वेधशाळेत ७४.९ मिमी पाऊस झाल्याचे केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news