आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ | पुढारी

आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला. आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला युनिक डिजिटल आरोग्य ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्रात संबंधित व्यक्तीची आरोग्यविषयक सर्व माहिती समाविष्ट असेल. १५ ऑगस्ट २०२०रोजी लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना राबविली जात आहे.

देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आमुलाग्र बदल

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे.

देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत असून गेल्या सात वर्षात करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे आजचा टप्पा गाठला आला आहे. डिजिटल क्षेत्रात देशाने केलेली कामगिरी चमकदार आहे.

सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना अंमलात आणली जाईल.

त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी होईल. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना आयुष्यमान भारत डिजिटल मोहिम सुरु होत आहे, हाही एक योगायोग असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गियांना माफक दरात उपचार मिळणे शक्य झाले आहे.

डिजिटल फॉर्ममध्ये आल्यानंतर योजनेचा आणखी विस्तार होणार आहे. डिजिटल इंडिया अभियानाने सामान्य नागरिकांची ताकत वाढविली आहे.

सध्या देशातील १३० कोटी लोकांकडे आधारकार्ड असून ११८ कोटी मोबाईल वापरकर्ते, ८० कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि ४३ लोकांची जनधन बँक खाती आहेत. अशी आकडेवारी जगातील कोणत्याही देशाकडे नाही, असेही मोदी यांनी स्‍पष्‍ट केले.

कोरोना संकटाच्या संदर्भात ते म्हणाले की, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली आहे. याशिवाय देशात सर्वांना मोफत लस दिली जात आहे. आतापर्यंत सुमारे ९० कोटी लोकांना लस देण्यात आली असून यात को-अ‍ॅपची महत्त्‍वाची भूमिका आहे.

कोरोना संकट काळात टेलिमेडिसिनचाही मोठा फायदा झाला आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी नागरिकांनी मोफत उपचार घेतलेले आहेत.

देशात याआधी कित्येक गरीब लोक होते, की जे दवाखान्यात जायला घाबरत असत; पण आयुष्यमान भारत योजना आल्यामुळे त्यांच्या मनातील भीती निघून गेली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हेही वाचलं का ? 

 

 

 

Back to top button