सेन्सेक्स च्या उसळीचा अन्वयार्थ | पुढारी

सेन्सेक्स च्या उसळीचा अन्वयार्थ

डॉ. विजय ककडे

ज्या सेन्सेक्सला 30 हजारांचा टप्पा गाठण्यास 21 वर्षे लागली, तोच सेन्सेक्स 21 महिन्यांत 60 हजारांचा टप्पा पार करू शकला. ही गरुडझेप आहे का पतंगाचे उंचावणे, हे मात्र अभ्यासणे महत्त्वाचे ठरते! अर्थव्यवस्थेत कोव्हिड परिणाम प्रबळ असताना सेन्सेक्स मात्र एकमार्गी वेगवान झाला आहे. त्यामागील कारणे लक्षात घेतल्यास ही वाढ समजू शकते.

भारतीय शेअर बाजारात 24 सप्टेंबर हा दिवस सेन्सेक्स म्हणजे भांडवल बाजाराचा संवेदनशील सूचकांक 60,000 चा टप्पा ओलांडल्याने ऐतिहासिक महत्त्वाचा ठरतो. भांडवलबाजारात त्यांच्या भांडवल मूल्यांकनाच्या (बाजारभावाने) आधारे 30 कंपन्यांना संवेदनशील सूचकांकात समाविष्ट केले जाते व यातील कंपन्यांच्या शेअर्स किमतीमधील बदल सेन्सेक्समध्ये मोजला जातो. सध्या 5000 पेक्षा अधिक कंपन्या भांडवलबाजारात असून त्यापैकी 30 कंपन्यांना सेन्सेक्समध्ये समाविष्ट केले जाते.

त्यामध्ये ज्या कंपन्यांची कामगिरी व बाजारमूल्य वाढते, त्यांना समाविष्ट करून कमी कामगिरी व घटलेले बाजारमूल्य यांना वगळले जाते. सेन्सेक्सची नवी भरारी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण त्याचे अंतरंग व अन्वयार्थ सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या द़ृष्टीने पाहिल्यास त्यातून प्राप्त होणारे अर्थभान पुढील दिशा समजून घेण्यास उपयुक्त ठरेल.

सेन्सेक्सचा प्रवास

1978-79 हे पायाभूत वर्ष घेऊन 1986 मध्ये सेन्सेक्स मोजण्यात आला. स्टँडर्ड अ‍ॅड पुअर बीएसई सेन्सेक्स केवळ भारतातच नव्हे, तर सर्व प्रमुख भांडवलबाजारात महत्त्वपूर्ण मानला जातो. मापनपद्धतीत 2003 मध्ये बदल करण्यात आला व कंपन्यांच्या मुक्त-तरल बाजार भांडवल मूल्याचा (free float market capitalization) वापर करण्यात आला. सध्या निफ्टी (NIFTY) हा 50 शेअर्स मूल्यांच्या आधारे राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक व्यवहार मूल्याने मोठा भाऊ असला तरी छोट्या भावाची मोठी कामगिरी सध्या चर्चेत आहे.

1990 मध्ये असलेला 1000चा टप्पा पुढे ऑक्टोबर 1999 मध्ये 5000; फेब्रुवारी 2006 मध्ये 10,000; जुलै 2007 मध्ये 15,000; तर ऑक्टोबर 2007 मध्ये 20,000; मे 2014 मध्ये 25,000; मे 2015 मध्ये 30,000 तर डिसेंबर 2020 मध्ये 50,000 आणि सप्टेंबर2021 मध्ये 60,000 असा प्रवास झालेला आहे. ज्या सेन्सेक्सला 30 हजारांचा टप्पा गाठण्यास 21 वर्षे लागली. तोच सेन्सेक्स 21 महिन्यांत 60 हजारांचा टप्पा पार करू शकला. ही गरुडझेप आहे का पतंगाचे उंचावणे आहे, हे मात्र अभ्यासणे महत्त्वाचे ठरते!

सेन्सेक्स का वाढला?

सेन्सेक्सची आश्चर्यकारक उसळी ही अनेकांना संभ्रमात टाकणारी असून सेन्सेक्सने 40 हजारांचा टप्पा पार करताच ही इमारत कोसळणारच, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. बाजार घसरणीचे ‘अस्वल’ आता गुहेत लपले असून त्याच्या भरवशावर असणारे प्रचंड नुकसान सहन करत आहेत. अर्थव्यवस्थेत कोव्हिड परिणाम प्रबळ असताना सेन्सेक्स मात्र एकमार्गी वेगवान झाला आहे. त्यामागील कारणे लक्षात घेतल्यास ही वाढ समजू शकते.

सेन्सेक्स वाढीसाठी सहा महत्त्वपूर्ण घटक जबाबदार ठरले. सेन्सेक्सची भरधाव प्रगती ही अर्थव्यवस्थेत रोखता वाढण्याचे फलित आहे. कोव्हिड परिणामाने अर्थचक्र अनेक देशात मंदावले. त्याला गतिमान करण्यासाठी सर्वच देशात चलनपुरवठा वाढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे वाढलेली रोखता गुंतवणुकीस उपलब्ध झाली. वास्तव गुंतवणुकीपेक्षा वित्तीय गुंतवणूक सोईस्कर व फायद्याची ठरली.

भारतीय बाजार तुलनेने आकर्षक वाटल्याने विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांनी 9 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात केली, हे दुसरे कारण होते. याच्या जोडीला भारतीय गुंतवणूकदार हळूहळू शेअर्सकडे वळू लागला. बँकांतील मुदतठेवी हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय घटत्या व्याजदराने महागाईपेक्षा कमी परतावा देऊ लागल्याने पर्यायी गुंतवणूक म्युच्युअल फंड व शेअर्स ठरले. विदेशी गुंतवणूकदारांसोबत भारतीय गुंतवणूकदारांचे पाठबळ हे तिसरे कारण सेन्सेक्सला बळ देणारे ठरले. अर्थव्यवस्थेची उभारी विविध निकषावर दिसत असल्याने गुंतवणूक वाढीस पोषक वातावरण ठरले.

या कारणाचाही सेन्सेक्सवर अनुकूल परिणाम झाला. मुळाच पायाभूत वर्ष हे कोरोना काळातील उणे विकासाचे असल्याने झालेली वाढ प्रचंड वाटते. हा पायाभूत परिणाम आशावाद बळकट करणारा ठरला. शेअर बाजारात असा प्रचंड महापूर गुंतवणुकीचा येत असताना ‘चांगले’ शेअर्स मर्यादितच होते. त्यामुळे त्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली व त्यांनी भरघोस परतावा दिला. त्यांच्या किमती प्रतिदिन वाढत गेल्या व सेन्सेक्स विक्रमी ठरला.

भारताच्या संभाव्य विकासाचा आशावाद आणि इतरत्र तुलनेने कमी संधी यातून विनाप्रवाह शेअरबाजारात नवी लाट आणणारी ठरला. गुंतवणूकदार लक्षाधीश, कोट्यधीश होऊ लागले व प्रारंभिक भाग विक्रीस उदंड प्रतिसाद मिळून अति उत्साहाचे, आनंदाचे चित्र प्रस्थापित झाले.

साठीची सावधानता हवी!

सेन्सेक्स अथवा शेअरबाजार रेषीय मार्गे जात नसतो. त्यामुळे सर्वसाधारम गुंतवणूकदारांना आता काय करावे, हा मोठा प्रश्न आहे. सेन्सेक्सचा वारू असाच पुढे जाईल व 1,00,000 चा टप्पा गाठेल, असा आशावाद व्यक्त होताना जागतिक पटलावर अर्थभूगर्भीय हालचालीवर लक्ष हवे. चीनच्या बांधकाम व्यवसायात दिवाळखोरीचे संकट एव्हरग्राऊंडच्या रूपात तयार होत असून आपणाकडे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, ही जोखीम आहेच.

जगातील प्रमुख केंद्रीय बँका वित्तपुरवठा कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात व त्याचा परिणाम बाजार घसरणीत होऊ शकतो. इतरत्र गुंतवणूक संधी वाढल्या तर भारतातील विदेशी गुंतवणूक परत जाऊ शकते, हाही धोका आहे.

सध्या भांडवलबाजाराचे राष्ट्रीय उत्पनाशी असणारे गुणोत्तर 1.3 असे असून तेही अतिरिक्त आहे. बाजारात किंमत उपार्जन गुणोत्तर 27 पर्यंत गेले असून तेही उच्च आहे. हे सर्व घटक बाजाराच्या दिशेत बदल सुचवतात. तथापि, बाजारातून काढता पाय न घेता उत्तम दर्जाच्या कंपनीत आपली गुंतवणूक वाढवणे हाच दीर्घकालीन फायद्याचा मार्ग ठरतो, हे अर्थभान जपले पाहिजे!

Back to top button