

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Petrol-Diesel Price Today जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी डिझेल दरात 22 पैशांची वाढ केली. दुसरीकडे पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
गेल्या 18 दिवसांपासून इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांत क्रूड तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डिझेल दरवाढ करण्यात आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Petrol-Diesel Price Today) डिझेलचे दर 22 पैशांनी वाढून प्रति लिटर 96.41 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोलचे दर मात्र 107.26 रुपयांवर स्थिर आहेत.
याआधी 15 जुलै रोजी डिझेल दरात वाढ करण्यात आली होती. ताज्या वाढीनंतर दिल्लीत डिझेलचे दर 88.82 रुपयांवर गेले असून पेट्रोल 101.19 रुपयांवर स्थिर आहे.
कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर क्रमशः 91.92 आणि 93.46 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोलचे दर क्रमशः 101.62 आणि 98.96 रुपयांवर स्थिर आहेत.
4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 11.44 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून पेट्रोलचे दर बर्यापैकी स्थिर आहेत. दुसरीकडे याच कालावधीत डिझेलच्या दरात 9.14 रुपयांची वाढ झालेली आहे.