भारतीय उद्योगांची सर्वात वाईट कामगिरी; औद्योगिक उत्पादन 26 महिन्यांच्या नीचांकावर, उत्पादनात ४ टक्क्यांनी घट | पुढारी

भारतीय उद्योगांची सर्वात वाईट कामगिरी; औद्योगिक उत्पादन 26 महिन्यांच्या नीचांकावर, उत्पादनात ४ टक्क्यांनी घट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्टोबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात चार टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. ऑगस्ट २०२० पासून गेल्या २६ महिन्यांतील भारतीय उद्योगांची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. त्यावेळी औद्योगिक उत्पादनात ७.१% घट झाली होती. उत्पादन क्षेत्रात घट झाल्यानंतर आता खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रातील कमकुवत कामगिरीमुळे घट झाली आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) ४.२ टक्क्यांनी वाढला होता. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, उद्योगाची वाढ केवळ एका महिन्याच्या अंतरानंतर नकारात्मक झाली आहे. औद्योगिक उत्पादन वाढीचा दर या वर्षी सप्टेंबरमध्ये ३.५ % होता, तर ऑगस्टमध्ये तो ०.७% ने घसरला. आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्र ऑक्टोबरमध्ये 5.6 टक्क्यांनी घसरले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ३.३ टक्क्यांनी वाढ झाली होती. खाणकाम आणि वीज निर्मिती अनुक्रमे २.५ टक्के आणि १.२ टक्क्यांनी वाढली आहे. टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात १५.३ टक्क्यांची मोठी घट झाली आहे, तर गैरटिकाऊ वस्तूंच्या उत्पादनात १३.४ टक्क्यांनी घट झाली आहे.

अपेक्षेपेक्षा गुंतवणुकीत घट

रेटिंग एजन्सी ICRA च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदिती नायर यांनी IIP मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त घसरण झाली असल्याचे म्हटले आहे. आकडेवारीनुसार निर्यातीची कमकुवत कामगिरीही दिसून येते. याशिवाय सणासुदीच्या काळात सुट्या आल्याने औद्योगिक उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे त्यांचे मत आहे. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, भांडवली उत्पादनांची कामगिरी निराशाजनक आहे कारण ती गुंतवणुकीतील मंदीकडे निर्देश करते.

हेही वाचा :

Back to top button