अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे? | पुढारी

अंबादास दानवे यांची निवडणूक आयोगावर शंका, निवडणूक चिन्हाबाबत काय म्हणाले दानवे?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अविरत काम करत असून, जनतेचे पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाकडील सुनावणीवर शंका उपस्थित करत आयोग पक्षपातीपणे काम करत आहे की काय, असा जनतेच्या मनातील संशयही बोलून दाखविला.

नाशिकमध्ये खासगी कामानिमित्त आलेल्या ना. दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समृध्दी महामार्ग लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर दिलेल्या शाबासकीच्या थापेविषयी बोलताना ‘पाठीवर पडलेली थाप कधी निघेल हा अनुभव शिंदेंना लवकरच येईल’, अशी कोपरखळी लगावली. शॉर्टकट राजकारण ही विकृती आहे. देशातील काही राजकीय नेते पक्ष शॉर्टकटचे राजकारण करत देशाचे नुकसान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली होती. या वक्तव्याचा संदर्भ देत दानवे म्हणाले, शॉर्टकट राजकारण्यांना धडा शिकवा, असे मोदी म्हणाले ते खरच आहे. महाराष्ट्रात गद्दारी करून सत्ता आणणे हा शॉर्टकटच्याच राजकारणाचाच भाग आहे. या सर्व प्रवृत्तीला जनताच धडा शिकवेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाच्या निर्णयावर बोलताना दानवे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या बटीक असल्यासारख्या वागत असल्याचे खा. राऊत यांच्या जामिनातून स्पष्ट झाले असून, आता देशमुख यांच्याही जामिनातून ते स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ठाकरे यांच्या सोबत राहिलो असतो तर माझ्या नावासमोर माजी आमदार लागले असते, असे वक्तव्य कृषिमंत्री सत्तार यांनी शनिवारी (दि.१०) नाशिकमध्ये केले होते. त्यालाही दानवे यांनी प्रत्युत्तर देत सत्तार यांच्या घरासमोर माजी आमदार म्हणूनच पाटी लागेल. त्यांनी चिंता करू नये, असा टोला त्यांनी सत्तारांना लगावला.

शाईफेकीची घटना चुकीचीच

उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेबाबत बोलताना दानवे म्हणाले, शाईफेकीची घटना चुकीचीच आहे. मात्र, घटना कशामुळे घडली याचा विचार संबंधितांनी करावा. घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करणे चुकीचे असून, पत्रकारांचा काहीही संबंध नाही.

हेही वाचा :

Back to top button