RBI Repo Rate – व्याजदर वाढल्याने महागाई कशी कमी येते?

RBI Repo Rate – व्याजदर वाढल्याने महागाई कशी कमी येते?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Repo दरात ५० बेसिक पॉईंटने वाढ केलेली आहे. ५० बेसिक पॉईंट याचा अर्थ ०.५ टक्के इतका होतो. वाढती महागाई रोखण्यासाठी विविध देशातील बँका सध्या व्याजदरात वाढ करत आहेत. पण रेपो दर वाढल्याने महागाई कशी नियंत्रणात येते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख. (How inflation repo rate and demand are linked?)

व्याजदरातील वाढ आणि महागाई यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपण आधी Repo Rate ही संकल्पना समजून घेऊ. रिझर्व्ह बँक देशातील इतर व्यापारी बँकांना कर्ज देत असते. या कर्जाचा व्याजदर म्हणजे Repo Rate होय. जेव्हा व्यापारी बँकांकडे निधीची कमतरता असते तेव्हा व्यापारी बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतात. हे कर्जावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Repo Rateनुसार व्याजदर आकारते. हे कर्ज देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ट्रिझरी बिल्स, सरकारी बाँडस तारण म्हणून घेत असते.

अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो?

Repo Rate महागाई नियंत्रणासाठी वापरले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाई नियंत्रणात आणण्यासाठी Repo दर वाढवते. तर दुसरीकडे जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते, तेव्हा Repo Rate कमी केला जातो.

ग्राहकांवर कसा परिणाम होतो?

Repo Rate जेव्हा वाढतो तेव्हा व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून मिळणारे कर्ज महागते. सहाजिकच यामुळे बँकाची कर्ज घेण्याची क्षमता कमी येते. याचा ग्राहकावर दोन प्रकारे परिणाम होतो.

Reserve Bank of India
Reserve Bank of India

पहिला म्हणजे बँका ठेवीवरील व्याजदर वाढवतात. बँकेतील रोख रक्कम वाढावी, यासाठी हे पाऊल उचलले जाते. व्याजदर वाढल्याने ग्राहक बँकामध्ये ठेवी ठेवण्यासाठी उद्युक्त होतात. पण अधिकाधिक रक्कम बँकेत ठेवली गेल्याने बाजारातील पैसा कमी होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी कमी होण्यास मदत होते. जर पुरवठा साखळी नीट कार्यरत असेल तर कमी मागणीमुळे महागाई नियंत्रणात येऊ लागते.

दुसरा परिणाम असा होतो, बँका कर्जावरील व्याजदर वाढवतात. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज अशी विविध कर्जं महाग होतात. कर्ज महाग झाल्याने ग्राहक कर्ज घेण्याचे टाळतात, आणि त्यांच्या हातातील रक्कम कमी होते. शिवाय घर घेणे, वाहन घेणे, शैक्षणिक कर्ज घेणे अशा प्रकारच्या मोठ्या खरेदी ग्राहक टाळतात. अशा प्रकारे बाजारातील तरलता कमी आली तर महागाई नियंत्रणात येऊ लागते.
जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती असते आणि किमती घसरलेल्या असतात, तेव्हा रिझर्व्ह बँक Repo Rate कमी करते. यामुळे बाजारातील तरलता वाढते आणि मागणी वाढायला सुरुवात होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news