मुंबई; पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने (Sensex) आज शुक्रवारी ऐतिहासिक उसळी घेतली. सेन्सेक्सने ५८ हजारांचा टप्पा पार केला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) २१७ अंकांनी वाढून ५८ हजारांवर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) ६१ अंकांनी वाढून १७ हजारांवर गेला. सेन्सेक्सचा हा नवा विक्रम आहे.
दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास सेन्सेक्सची भरारी कायम होती. दुपारी सेन्सेक्स १९२ अंकांनी वाढून ५८,०४५ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ६४ अंकांनी वाढून १७,२९८ रुपयांवर होता.
शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे. त्यात कोरोनाचा धोका कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स वाढत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सेन्सेक्सच्या विक्रमी उसळीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेअर बाजारात असाच उत्साह राहिल्यास या महिन्यात सेन्सेक्स ६० हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच कोरोनाच्या दोन लाटांदरम्यान देशाची अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. आता कोरोना रुग्णसंख्या घटल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत चीनच्या तुलनेत वेगाने सुधारणा होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात परदेशी थेट गुंतवणूक वाढत आहे. यामुळे शेअर बाजार उसळला आहे.