शेअर बाजार : बँकिंग व औषधी कंपन्यांत गुंतवणूक संधी | पुढारी

शेअर बाजार : बँकिंग व औषधी कंपन्यांत गुंतवणूक संधी

डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या गुरुवारी 5 ऑगस्टला शेअर बाजार बंद होताना निर्देशांक 54.492 वर बंद झाला, तर निफ्टी 16.294 वर स्थिरावला. कोरोनाची पहिली, दुसरी लाटही येऊन गेली, तरी निर्देशांकाला त्याचा काहीही धक्का बसलेला नाही. तिथेही तेजीच्या एकामागून एक लाटा येतच आहेत. ही भरती अशीच कायम राहिली, तर दिवाळीच्या सुमारास निर्देशांक 58 हजार ते 60 हजारांच्या पातळीवर गेलेला असेल.

नवीन कंपन्या प्राथमिक समभाग विक्रीला काढतच आहेत आणि पूर्वीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे सरकारच्या भारतीय आयुर्विमा मंडळाचा महाकाय ‘इश्यू’ जेव्हा निघेल, तेव्हा वाढत्या निर्देशांकाच्या पातळीचा फायदा घेऊन सरकार विमा मंडळाच्या इश्यूची किंमत उंच स्तरावर ठेवेल आणि हजारो कोटी रुपये त्यातून मिळतील व त्याचा उपयोग अर्थव्यवस्थेचा पाया अजून मजबूत करण्याकडे होईल.
या वाहत्या गंगेत पतंजलीसारख्या कंपन्या हात धुवून घेणार आहेत. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना काही कंपन्यांचे भाव खालीलप्रमाणे होते.

हेग 2385 रुपये, ओएनजीसी 116 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार 285 रुपये, मन्नापूरम फायनान्स 212 रुपये, नवीन प्युओर 3693 रुपये- हा शेअर गेल्या काही महिन्यांत दुपटीने वाढला आहे.

स्टेट बँकेच्या नफ्यात 2020-21 मधील तिमाहीसाठी 55 टक्क्यांची वाढ दिसली आहे. हे लक्षात घेऊन निर्देशकांनी तिच्या व अन्य बँकांच्या समभागांची जोरात खरेदी केली आहे. स्टेट बँकेप्रमाणेच एचडीएफसी बँक व कोटक महिंद्रा बँक यांच्याही समभागांची जोरात खरेदी होत आहे.

कोरोनाचे संकट जसजसे वाढत गेले तसतसे सर्वसाधारण विमा कंपन्यांकडे ‘कोरोना रक्षक’ पॉलिसीसाठी भरपूर मागणी आली. या पॉलिसीमुळे सर्वसाधारण विमा कंपन्यांचा गवगवा जितका झाला तितका जगातल्या अन्य देशात झालेला नाही.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक आपले द्वैमासिक वित्तधोरण जाहीर करेल, त्यावेळी रेपोदरात काही फरक झाला नसल्याचे दिसेल.

गुंतवणूकदारांनी सध्या बँकिंग व औषधी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करणे इष्ट ठरेल; मात्र ही खरेदी टप्प्याटप्याने व आपल्याला झेपेल तितकी जोखीम लक्षात घेऊन करावी. व्होडाफोन, केर्न एनर्जी अशा कंपन्यांवर आकारलेला ‘पूर्वलक्ष्यी आणि त्याच्या वसुली प्रकरणी कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय हेग लवादाकडे केलेले अपील आणि त्यामुळे भारताच्या व्यवसाय सुलभ देश या प्रतिमेला लागलेला धक्का, या सर्वाचा विचार करून केंद्र सरकारने अखेर पूर्वलक्ष्यी कर मागे घेण्याची घोषणा गुरुवारी केली. केर्न एनर्जी, व्होडाफोन अशा कंपन्यांकडून वसूल केलेला 8,100 कोटी रुपयांचा ‘पूर्वलक्ष्यी कर’ त्या त्या कंपन्यांना परत करण्यात येईल, असे सरकारने लोकसभेत स्पष्ट केले.

या नाजूक प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून कुमार मंगलम् बिर्ला यांनी व्होडाफोन आयडीयातून राजीनामा देऊन आपले अंग काढून घेतले आहे.

संबंधित थकबाकीचा डोंगर वाढत असतानाच कंपनीला नवा व्यवसाय मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाल्यास मात्र दोन खासगी बँकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची व त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कंपनीने स्टेंट बँकेकडून 11000 कोटी, येस बँकेकडून 4000 कोटी तर इंड सिंड बँकेकडून 3500 कोटी रुपयांची कर्जे घेतली आहेत.

Back to top button