Bihar Politics : म्हणून महाराष्ट्रात शिवसेना फोडली; भाजप खासदार सुशीलकुमार मोदींनी दिली कबुली | पुढारी

Bihar Politics : म्हणून महाराष्ट्रात शिवसेना फोडली; भाजप खासदार सुशीलकुमार मोदींनी दिली कबुली

पाटणा; पुढारी ऑनलाईन : Bihar Politics : बिहारमध्ये जेडीयू (जनता दल युनायटेड) भाजपशी फारकत घेऊन ‘आरजेडी’सोबत (राष्ट्रीय जनता दल) सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला. या पार्श्वभूमीवर जेडीयू आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. जेडीयू अध्यक्ष ललन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्या काळात जेडीयू १७ वर्ष एनडीए सोबत राहिला. पण कधीही १७ सेकंदाची अडचण आली नाही. भाजपने पाठीत सुरा खुपसण्यासाठी काय काय नाही केले?, असा सवाल करत ललन सिंह यांनी भाजपवर आरोप केले आहेत. जेडीयूकडून करण्यात आलेल्या आरोपांवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी उत्तर दिले आहे.

आम्ही कोणत्याही मित्रपक्षांशी संबंध तोडत नाही. पण ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांच्याशी आम्ही संबंध तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला धोका दिला. याचे परिणाम त्यांना भोगावे लागले, अशा शब्दांत सुशीलकुमार मोदी यांनी शिवसेनेवर निशाणा साधत एकप्रकारे महाराष्ट्रात शिवसेना फोडल्याची कबुली दिली आहे. ”नितीश कुमार यांना आरजेडीसोबत राहून जो सन्मान मिळाला नाही तो भाजपसोबत असताना मिळाला. आमच्याकडे अधिक संख्याबळ असतानाही आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवले. कधीही त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आम्हाला धोका दिला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.” असे सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि शिवसेनेचे उदाहरण देत सुशीलकुमार मोदी यांनी जेडीयूला इशारा (Bihar Politics) दिला आहे. याआधी सुशीलकुमार यांनी मंगळवारी ट्विट करत नितीश कुमार आणि जेडीयूने केलेल्या आरोपांवर उत्तर दिले होते. हे साफ खोटे आहे की भाजपने नितीश कुमार यांच्या सहमतीशिवाय आरसीपी सिंह यांना मंत्री केले. भाजप जेडीयूला फोडत असल्याचा आरोपही खोटा आहे. केवळ ते एक निमित्त शोधत होते. भाजप २०२४ मध्ये मोठ्या बहुमताने पुढे येईल, असे सुशीलकुमार यांनी म्हटले होते.

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले असून ते कोणत्याही क्षणी तुरुंगात जाऊ शकतात, असे वक्तव्यदेखील सुशीलकुमार मोदी यांनी केले. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राजदसोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांच्या आरोपांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली.

ते म्हणाले की, संयुक्त जनता दलाचे आरसीपी सिंह यांना नितीश कुमार यांच्या संमतीनेच केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले होते. त्यामुळे नितीशकुमार यांना याबाबत कल्पना नव्हती हा त्यांचा आरोप खोटा आहे. आम्हीच नितीशकुमार याना पाच वेळा मुख्यमंत्री केले. २०२० च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच मते मिळाली.

तेजस्वी यादव यांच्या राजद (RJD) आणि इतर विरोधी पक्षांसोबत नवीन “महाविकास आघाडी” जाहीर केल्यानंतर नितीश कुमार यांनी काल बुधवारी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर तेजस्वी यादव बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले. बिहारमध्ये जेडीयूने भाजपशी काडीमोड घेतला आहे. त्यांनी आता ‘राजद’सोबत (राष्ट्रीय जनता दल) नवा घरोबा केला आहे.

 हे ही वाचा : 

Back to top button