Nitish Kumar and BJP : नितीश कुमार आणि भाजप; 26 वर्षांत दुसऱ्यांदा काडीमोड! | पुढारी

Nitish Kumar and BJP : नितीश कुमार आणि भाजप; 26 वर्षांत दुसऱ्यांदा काडीमोड!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nitish Kumar and BJP : बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय उपथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. नितीश कुमार यांनीही मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर मीडिया समोर त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि भाजप नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. 2013 पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केल्याचाही त्यांनी आरोप केला.

दरम्यान, नितीश कुमार (Nitish Kumar and BJP) यांनी गेल्या 26 वर्षात भाजपपासून फारकत घेण्याची ही दुसरी वेळ आहे. नितीशकुमार समता पार्टीच्या काळापासून भाजप सोबत आले. 2000 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते भाजपसोबतच होते. तेव्हापासून त्यांनी सात वेळा हे पद भूषवले आहे. यापैकी पाच वेळा भाजप मुख्यमंत्री शपथविधीदरम्यान नितिश कुमार यांचा मित्रपक्ष होता.

2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर

2000 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा नितीश कुमारांच्या (Nitish Kumar and BJP) पक्षाचे नाव समता पार्टी होते. भाजप, समता पार्टी आणि इतर काही छोटे पक्ष एकत्र निवडणूक लढले. त्यावेळी राजद, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष एकत्र रिंगणात होते. एनडीए आघाडीला निवडणुकीत 151 जागा मिळाल्या. भाजपने 67 जागा जिंकल्या होत्या. नितीश कुमार यांच्या पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. एनडीए आघाडीने नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. नितीश यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, बहुमताचा आकडा 163 होता. आरजेडीच्या नेतृत्वाखालील यूपीएचे 159 आमदार होते. बहुमताच्या आकड्यांअभावी नितीश यांना सात दिवसांत राजीनामा द्यावा लागला आणि यूपीए आघाडीचे सरकार स्थापन झाले.

2005 मध्ये जेडीयू-भाजप एकत्र निवडणूक लढले

2005 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 2003 साली म्हणजे निवडणुकीच्या दोन वर्षे आधी समता पार्टी ‘जेडीयू’ या नव्या नावाने अस्तित्वात आली. यामध्ये नितीशकुमार यांच्या समता पार्टीसह लोकशक्ती, जनता दल (शरद यादव गट), राष्ट्रीय लोक समता पक्ष यांचे विलीनीकरण करण्यात आले. यानंतर एनडीएचा घटक पक्ष म्हणून जेडीयूने भाजपच्या साथीने ने एकत्रित निवडणूक लढवली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याही युती किंवा पक्षाला बहुमत मिळाले नाही.

रामविलास पासवान यांच्या एलजेपीला 29 जागा मिळाल्या. पासवान ज्यांच्या सोबत गेले असते, त्यांचे सरकार बनले असते. पण, दलित किंवा मुस्लिम मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर पासवान ठाम होते. दोन्ही आघाड्या त्यांची अट मान्य करायला तयार नव्हते. कारण, एकीकडे तत्कालीन मुख्यमंत्री राबडी देवी युपीएच्या नेत्या होत्या, तर दुसरीकडे नितीशकुमार हे एनडीचे नेते होते. दरम्यन, राज्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू होती.

नव्याने निवडणुका झाल्या. यावेळी एनडीएतील जेडीयूला 88 तर भाजपला 55 जागा मिळाल्या. ही आकडेवारी 122 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त होती. नितीशकुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

2010 मध्ये नितीश तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

एनडीएने 2010 मध्ये एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर जेडीयूला 115, भाजपला 91 जागा मिळाल्या. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीच्या 22 जागा कमी झाल्या. त्यानंतर नितीशकुमार यांना तिसऱ्यांदा बिहारची सत्ता मिळाली. ते मुख्यमंत्री झाले.

2013 मध्ये नितीश यांनी सोडली भाजपची साथ

2013 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतचा 17 वर्षांच्या सहवास सोडला. तेव्हा भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले होते. भाजपचा हा निर्णय नितीशकुमार यांना मान्य नव्हता. त्यांनी एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या सर्व मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली. आरजेडीने नितीश यांना पाठिंबा जाहीर केला. नितीश मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. नितीश यांच्या पक्षाने 2014 ची लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली. पण त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. केंद्रात एनडीएची सत्ता आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि दलित नेते जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले. मात्र, फेब्रुवारी 2015 मध्ये नितीशकुमार यांनी पुन्हा बिहारची सत्ता हाती घेतली आणि ते मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांचे मित्रपक्ष राजद आणि काँग्रेस होते.

2015 मध्ये जेव्हा बिहारमध्ये महागठबंधनची स्थापना झाली..

2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि इतर छोटे पक्ष एकत्र आले. दोघांनी मिळून महाआघाडी स्थापन केली. त्यानंतर लालूंच्या आरजेडीला 80, नितीशकुमारांच्या जेडीयूला 71 जागा मिळाल्या. भाजपचे 53 आमदार निवडून आले. आरजेडी, काँग्रेस आणि जेडीयूने मिळून सरकार स्थापन केले आणि नितीशकुमार पुन्हा पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. लालूंचा मुलगा तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री तर दुसरा मुलगा तेज प्रताप यांना आरोग्यमंत्री करण्यात आले.

2017 मध्ये तेजस्वी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा नितीश कुमार यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. मात्र, राजदने नकार दिला. यानंतर नितीश कुमार यांनी स्वतः राजीनामा दिला आणि काही तासातच भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. ते पुन्हा सहाव्यांदा भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले.

भाजपने जास्त जागा जिंकल्या, तरीही नितीशच मुख्यमंत्री

2020 मध्ये भाजप-जेडीयूने एकत्रित विधानसभा निवडणूक लढवली. जेडीयूने 115, तर भाजपने 110 जागांवर आपले उमेदवार उभे केले. भाजपने चमकदार कामगिरी करत 74 जागा जिंकल्या. जास्त जागा लढवूनही जेडीयूचे फक्त 43 उमेदवारच निवडून आले. पण तरीही नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री पदाची खुर्ची देण्यात आली आणि भाजपने दोन उपमुख्यमंत्री केले.

सध्या बिहार विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 243 आहे. येथे बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 122 जागांची आवश्यकता आहे. सध्याची आकडेवारी पाहता राजद हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे 79 आमदार आहेत. तर भाजपचे 77, जेडीयू 45, काँग्रेस 19, डावे पक्ष 16, एआयएमआयएम 1, हिंदुस्थानी अवाम मोर्चा 4 आमदार आणि एक अपक्ष आमदार आहे.

लालूंना मुख्यमंत्री करताच बंडाचा झेंडा

1985 मध्ये नितीश कुमार यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. चार वर्षांनंतर 1989 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली. यानंतर 1990 मध्ये त्यांनी जनता दलातील आपले ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत केली. नितीशकुमार हे लालूंना मोठा भाऊ म्हणत. 1991 च्या मध्यावधी निवडणुकीत नितीश बारह भागातून निवडणूक जिंकले. 1994 मध्ये नितीश यांनी लालू यादव यांच्या विरोधात बंड केले आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना केली.

Back to top button