National Herald Case : दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीचा छापा | पुढारी

National Herald Case : दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीचा छापा

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्लीतील नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला. ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात  (National Herald Case ) जाऊन शोध मोहीम घेत आहेत. ही कारवाई आज (दि.२) सकाळपासून सुरू करण्यात आली आहे.

(National Herald Case) दिल्लीशिवाय ईडीने देशभरात जवळपास १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीचे दिल्लीतील तपास अधिकारी हेराल्ड हाऊसच्या कार्यालयात असून ते कागदपत्रांची तपासणी करत आहेत. दिल्ली, कोलकाता यासह १२ ठिकाणी छापेमारीची कारवाई सुरू आहे. डोटेक्स मर्चेंडाईज आणि सुनील भंडारी यांच्या कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या चौकशीत एनआयएला ज्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता तपास यंत्रणा या ठिकाणी शोध घेत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच त्यांचे पुत्र राहुल गांधी यांची अलिकडेच सक्‍तवसुली संचलनालयाने (ईडी) हवाला व्यवहाराच्या संदर्भात चौकशी केली होती. या अनुषंगाने ईडीने मंगळवारी नॅशनल हेरॉल्ड वृत्‍तपत्राच्या मुख्यालयाबरोबरच बारा ठिकाणांवर छापे टाकले. दरम्यान यंग इंडिया ही नफा कमाविणारी कंपनी नाही, त्यामुळे हवालाचा व्यवहार करण्याचा संबंधच येत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

ईडीने गेल्या महिन्यात सोनिया तसेच राहुल गांधी यांची चौकशी केली होती. सोनिया गांधी यांना तीन दिवसांत शंभर प्रश्‍न विचारण्यात आले होते. तर राहुल गांधी यांना पाच दिवसांच्या चौकशीदरम्यान दीडशे प्रश्‍न विचारण्यात आले होते. नॅशनल हेरॉल्डची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे यंग इंडिया नावाच्या कंपनीने अधिग्रहण केले होते. यंग इंडियामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची ३८ टक्क्यांची हिस्सेदारी आहे. कवडीमोल दरात असोसिएटेड जर्नल्सच्या ८०० कोटी रुपयांच्या संपत्‍तीचे यंग इंडियाचे अधिग्रहण केल्याचा व या व्यवहारात हवाला मार्गाचा अवलंब केल्याचा ईडीचा संशय आहे.

यंग इंडियामधील सोनिया आणि राहुल गांधी यांची हिस्सेदारी मालमत्‍ता म्हणून संबोधली जावी व त्यावर कर आकारला जावा, असे दुसरीकडे आयकर खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ईडी आणि आयकर खाते अशा दुहेरी कात्रीत गांधी कुटुंबिय सापडलेले आहे. भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी २०१३ साली सर्वप्रथम नॅशनल हेरॉल्डच्या अनियमिततेबद्दल तक्रार केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button