5G services : देशात 5G सेवा ऑक्‍टोबरपर्यंत सुरु होणार : मंत्री अश्‍विनी वैष्‍णव | पुढारी

5G services : देशात 5G सेवा ऑक्‍टोबरपर्यंत सुरु होणार : मंत्री अश्‍विनी वैष्‍णव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 5G स्‍पेक्‍ट्रमचा लिलाव हा १.५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीला पूर्ण झाला आहे. आता भारतात 5G दूरसंचार सेवा (5G services) ही याचवर्षी ऑक्‍टोबरपर्यंत सुरु होण्‍याची शक्‍यता आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांनी दिली. सोमवारी स्‍पेक्‍ट्रम लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अश्‍विनी वैष्‍णव म्‍हणाले की, “5G स्‍पेक्‍ट्रमचा लिलावात आतापर्यंत सुमारे ७१ टक्‍के लिलाव झाला आहे. एकूण ७२,०९८ MHz स्‍पेक्‍ट्रमपैकी ५१,२३६ MHz लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली आहे. गेल्‍या सात दिवसांमध्‍ये बोलीच्‍या ४० फेर्‍या झाल्‍या. आता १० ऑगस्‍टपर्यंत उर्वरीत स्‍पेक्‍ट्रमचे वाटप होईल. यानंतर या वर्षी ऑक्‍टोबर महिन्‍यापर्यंत देशात 5G सेवा सुरु होण्‍याची शक्‍यता आहे.”

5G services : लिलावातून १.५० लाख कोटींच्या स्पेक्ट्रमची विक्री!

देशातील ५ जी स्पेक्ट्रम लिलाव प्रकिया सोमवारी संपली.सात दिवस चाललेल्या स्पेक्ट्रम लिलावाच्या शेवटच्या दिवसापर्यंत १ लाख ५० हजार १७३ कोटींच्या स्पेक्ट्रमची विक्री झाली आहे. आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया ठरलेल्या या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी १.४५ लाख कोटींच्या निविदा सरकारला प्राप्त झाल्या होत्या. २६ जुलै पासुन सुरू झालेल्या या लिलाव प्रक्रियेत मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल तसेच गौतम अडाणी यांच्या कंपन्यांनी रेडिओ वेव करिता आतापर्यंतची सर्वात मोठ्या लिलावासाठी निविदा सादर केल्या होत्या.

लिलाव प्रक्रियेत जियो तसेच एअरटेल सह अनेक कंपन्यांनी उत्तर प्रदेश पुर्व सर्कल करीता १८०० मेगाहर्ट्स साठी निविदा सादर केली होती.दूरसंचार विभागाने या लिलाव प्रक्रियेत एकूण ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्स स्पेक्ट्रम ची विक्री केली. लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसेच वोडाफोन-आयडियासह अडाणी एंटरप्रायजेस सहभागी झाले होते. २०२२-२३ दरम्यान ५जी मोबाईल सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतीच लोकसभेत दिली आहे. अशात लिलाव प्रक्रिया संपन्न झाल्याने ५जी सुविधा मिळण्यास आणखी गती प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button