राष्ट्रपतींनी राज्‍यपालांना त्वरित पदमुक्त करावे : साहित्यिक, कलावंतांची मागणी | पुढारी

राष्ट्रपतींनी राज्‍यपालांना त्वरित पदमुक्त करावे : साहित्यिक, कलावंतांची मागणी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितलेली ‘कदाचित चूक झाली असेल’ या पद्धतीची माफी आम्हाला मान्य नसून राष्ट्रपतींनी त्यांना त्वरित पदमुक्त करावे, अशी मागणी मुंबईतील नामवंत साहित्यिक कलावंतांनी सोमवारी सायंकाळी मुंबईत जाहीरपणे केली.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा चौकात शेकडो मुंबईकरांनी ‘ मुंबई कुणाची? मराठी माणसाची’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शाहीर संभाजी भगत यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा गात हुतात्म्यांना सलामी दिली. यावेळी प्रभाकर नारकर, मराठी आठव दिवस उपक्रमाचे संयोजक रजनीश राणे, शाहीर मधू खामकर आदी उपस्थित होते.

त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या ‘ मुंबई मराठी जागर’ या कार्यक्रमात, अर्जुन डांगळे, प्रेमानंद गज्वी, प्रतिमा जोशी, संभाजी भगत, नरेंद्र वाबळे, राजाराम पाटील आदींनी लेखक-कलावंतांनी महाराष्ट्राचा जाणीवपूर्वक अपमान करत राहणाऱ्या राज्यपालांवर आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर शब्दांत आसूड ओढत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील गाजलेली अनेक स्फूर्तीगीते जुन्या- नव्या शाहीरांनी सादर केली. तर शेकडो जनांच्या सह्या असलेलं हे निवेदन पत्र राष्ट्रपतींना पाठवून हा विषय लावून धरण्यात येईल, अशी माहिती मुंबई मराठी जागर’ चे संयोजक डॉ. महेश केळुसकर यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button