R9X Hellfire Missile : जाणून घेऊया किती धोकादायक आहे R9X मिसाइल, ज्यानं अल-जवाहिरीचा केला खात्मा | पुढारी

R9X Hellfire Missile : जाणून घेऊया किती धोकादायक आहे R9X मिसाइल, ज्यानं अल-जवाहिरीचा केला खात्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेने अल- कायदा संघटनेचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याचा खात्मा केला. अमेरिकेने अफगाणिस्तानातील काबूलमध्ये ड्रोन स्ट्राइकच्या माध्यमातून हे ऑपरेशन यशस्वी केले. अल-जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी ठार झाल्याची माहिती अमेरिकेचे बायडेन यांनी दिली आहे. न्याय मिळाला आहे आणि दहशतवादी नेता अल-जवाहिरी मारला गेला आहे,” असे बायडेन यांनी व्हाइट हाऊसच्या बाहेर विशेष टेलिव्हिजन भाषणातून जाहीर केले. या ऑपरेशनची महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही स्फोटाविना आणि अन्य कोणालाही इजा न पोहोचवता अल-जवाहिरीचा खात्मा करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेने या हल्ल्यासाठी धोकादायक असलेल्या निंजा मिसाइल (six-blade ninja missile) चा वापर केला. हे हेच शस्त्र आहे ज्याने अल-कायदाचा नेता अबू अल- खैर अल- मसरीला मारले होते. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए गेल्या अनेक आठवड्यांपासून काबूलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीच्या हालचालीवर नजर ठेवून होती. व्हाइट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये बसलेले अधिकारी त्याच्या प्रत्येक कारवायांवरील रिपोर्टचा अभ्यास करत होती. अमेरिका त्याला मारण्यासाठी केवळ एक संधी शोधत होती.

अमेरिकेने सोमवारीच अल-जवाहिरीचा शेवट करण्याची आधीच तयारी केली होती. यामुळेच व्हाइट हाऊसने सोमवारी दुपारीच ज्यो बायडेन एक दहशतवाद्याविरोधातील कारवाईबाबत संबोधित करतील असे जाहीर केले होते. पण व्हाइट हाऊसने दहशतवाद्याच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. संध्याकाळ होताच बायडेन यांनी अल-जवाहिरी मारला गेल्याची पुष्टी केली.

हल्ल्याच्या ठिकाणाजवळच अमेरिकेचा होता सैन्यतळ

एका रिपोर्ट्सनुसार, अल जवाहिरीला शिपूर भागात मारण्यात आले. अफगाणिस्तानमधील हा तोच परिसर आहे जिथे अमेरिकेने सैन्यतळ बनवला होता. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याच्या एक वर्ष आधी अमेरिकेने येथील सैन्यतळ रिकामा केला होता.

R9X क्षेपणास्त्र आहे तरी काय?

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की अल-जवाहिरीच्या मृत्यूचा एक फोटो समोर आला आहे. घटनास्थळी स्फोट झाल्याच्या कोणत्याही खुना आढळून आलेल्या नाहीत. अमेरिकेने ड्रोन हल्ल्यासाठी धोकादायक हेलफायर R9X (Hellfire R9X) या क्षेपणास्त्राचा वापर केला. हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारचा स्फोट करत नाही. तर यातून धारधार ६ तलावारीसारखे ब्लेड्स बाहेर पडतात. या क्षेपणास्त्रावर ४५ किलो वजनाचे लोखंड असते. यावर ६ ब्लेड्स अशा प्रकारे फीट केलेले असतात की ते क्षणात लक्ष्यभेद करतात. हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्य भेदते. याला निंजा मिसाइलदेखील म्हटले जाते. यामुळे आजूबाजूच्या लोकांना कोणतीही इजा होत नाही. अल-जवाहिरीला मारण्यासाठी केलेल्या हल्ल्यात जवाहिरी सोडून त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य कोणत्याही नागरिकाला इजा पोहोचलेली नाही, असे बायडेन यांनी आपल्या संबोधनात म्हटले आहे. AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्रे (R9X hellfire Missile) हवेतून जमिनीवर मारा करणारी लेझर गायडेड सबसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. हेलफायर आर९एक्स (Hellfire R9X) पहिल्यांदा २०१७ तैनात करण्यात आले होते. अमेरिकेने या क्षेपणास्त्रानेच अल- कायदाचा दहशतवादी अबू अल- खैर अल-मसरीचा खात्मा केला होता. अमेरिकेचे सैन्य याच क्षेपणास्त्राचा कोणत्याही स्ट्राइकसाठी अधिक वापर करतात.

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अल-जवाहिरीचा काबूलच्या मध्यभागी असलेल्या एका घराचा माग काढला जेथे तो त्याच्या कुटुंबासह लपला होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या आठवड्यात या ऑपरेशनला मंजुरी दिली आणि रविवारी ते पार पडले.

Back to top button