सावधान… तुम्हीही होऊ शकता टोळीची शिकार; लक्ष विचलित करून ऐवज केला जातोय चोरी

सावधान… तुम्हीही होऊ शकता टोळीची शिकार; लक्ष विचलित करून ऐवज केला जातोय चोरी

अशोक मोराळे

पुणे : 'तुमचे पैसे खाली पडलेत… अहो, कारचे चाक पंक्चर झाले आहे,' अशी बतावणी करून जर कोणी तुमचे लक्ष विचलित करीत असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण, तुमच्या कारमधील किमती ऐवज चोरीला जाऊ शकतो. असे प्रकार आता शहरात वाढीस लागले आहेत. कारमधून ऐवज चोरी करणार्‍या टोळीने सध्या शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ना त्या बहाण्याने कारजवळ थांबून चालकाला बोलण्यात गुंतवून कारमधील लॅपटॉप, बॅग व इतर किमती ऐवज चोरी करण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. एवढेच नाही, तर रस्त्याच्या कडेला किंवा पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून देखील ही टोळी ऐवज चोरी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पूर्वी असे प्रकार शहरात सर्रास घडत होते. त्यात दोन वर्षे कोरोनाच्या काळात हे चोरटे अंडरग्राउंड झाले होते.

कोरोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येताच पुन्हा या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कामानिमित्त अनेक जण आपले किमती सामान कारमध्ये घेऊन फिरतात. प्रामुख्याने आयटी क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती त्यांच्यासोबत लॅपटॉप ठेवतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत या चोरट्यांकडून पाठीमागील सीटवर लॅपटॉप ठेवलेल्या बॅगेचा शोध घेतला जातो. त्यानंतर कार थांबताच चालकाला बोलण्यात गुंतविले जाते. 'कारचे चाक पंक्चर झाले आहे, पैसे पडले आहेत,' असे सांगून कारचालकाचे लक्ष विचलित केले जाते.

त्याचवेळी टोळीतील दुसरा सदस्य कारचा पाठीमागील दरवाजा उघडून बॅग चोरी करून पसार होतो. अगदी काही सेकंदांत हा प्रकार घडत असल्यामुळे कारचालकाला त्याचा थांगपत्ता देखील लागत नाही. जेव्हा तो बॅग पाहतो, तेव्हा ती गायब झालेली असते. तर काही घटनांत कोणी शेजारी नाही, हे पाहून कारची काच फोडून हे चोरटे ऐवज चोरी करतात. गेल्या काही दिवसांत शहरात असे प्रकार चांगलेच वाढीस लागले आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

असे व्हा सतर्क…
एखादी अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला गाडीची काच वाजवून काही सांगत असेल, तर कारमधून खाली उतरण्यापूर्वी वेळीच खात्री करा.
आपल्याजवळील मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्रे कारच्या मागील सीटवर, तसेच दर्शनी भागात ठेवू नका.
प्रामुख्याने लॅपटॉप कारच्या पाठीमागील सीटवर ठेवू नका.
तुम्हाला कोणी खाली पैसे पडल्याचे प्रलोभन दाखवत असेल, तर बळी पडू नका. कारण, तो चोरट्यांनी तुमच्यासाठी लावलेला सापळा
असू शकतो.
गाडी पार्क करताना सुरक्षित ठिकाणी पार्क करा. शक्यतो तेथे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असल्यास उत्तमच.
कोणी अशाप्रकारे चोरी करताना आढळल्यास तत्काळ पोलिसांना याची माहिती द्या.
संशयास्पद हालचाल करताना एखादी व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना कळवा.

कारची काच फोडून ऐवज लंपास
मोटारीची काच फोडून लॅपटॉप, कागदपत्रे लांबविण्यात आल्याची घटना स्वारगेट भागातील प्राप्तिकर भवन कार्यालयासमोर घडली. याबाबत व्यावसायिक अच्युत कोठारी (वय 42, रा. भूमकर चौक, ताथवडे) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोठारी व्यावसायिक आहेत. कामानिमित्त ते स्वारगेट परिसरात आले होते. प्राप्तिकर कार्यालयासमोर कोठारी यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीतून लॅपटॉप तसेच बँकेची धनादेशपुस्तिका, महत्त्वाची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. पोलिस हवालदार ए. जी. पाटील तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालक तरुणीचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी सोन्याचे कडे, कागदपत्रे असा दोन लाख 55 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

तसेच, गेल्या आठड्यात सदाशिव पेठ व चिलीज हॉटेल (खराडी) येथून कारमधील तीन लॅपटॉप चोरट्यांनी चोरी केले. सदाशिव पेठेत महेश वरपे (वय 41, रा. सहकारनगर) हे त्यांची इनोव्हा गाडी पार्क करीत होते. पुढील चाक पंक्चर झाल्याचा त्यांना संशय आल्याने ते खाली उतरून टायर पाहत होते. त्या वेळी अज्ञात चोरट्याने पाठीमागील दरवाजा उघडून 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप बॅगेसह चोरी केला. हा प्रकार घडल्यानंतर वरपे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदननगर-खराडी येथील एका हॉटेलसमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी 80 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप व अडीच हजार रुपयांची रोकड चोरी केली. याप्रकरणी ताहेर शेख (वय 31, रा. धनश्री पार्क, सूसगाव) यांनी चंदननगर परिसरात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news