

सांगली; स्वप्निल पाटील : जिल्ह्यातील अनेक तरुण सध्या वेगवेगळ्या अंमली पदार्थांचे अॅडिक्ट झाल्याचे दिसून येते. उच्चभू्र तरुणांसह मध्यमवर्गीय तरुण, तरुणींना याची चटक लागली आहे. 'मागणी तसा पुरवठा' या धर्तीवर सुरू असणारा हा गोरखधंदा सध्या जोमात आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळीदेखील सध्या कार्यरत आहे. शहरासह ग्रामीण भागात अंमली पदार्थ सहजासहजी मिळत असल्याने सधन भाग सध्या 'उडता पंजाब' झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या किती आहे, हे निश्चितपणे कळून येत नाही. पण आजकाल या असल्या नशाबाजीचे लोन अनेक भागात पसरताना दिसत आहे. सहज आणि कोठेही मिळणारा अंमली पदार्थ म्हणजे गांजा हे आता सर्वश्रुत आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात मॅफेड्रॉनची विक्री होत असल्याचे दिसून येते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अंमली पदार्थांपैकी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वस्तात मस्त असल्याने त्याला नशेखोरांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे मॅफेड्रॉन जिल्ह्यातील काही भागात उपलब्ध होऊ लागले आहे. उच्चभू्र तरुण, मध्यवर्गीय, गरीब तरुण देखील यामध्ये गुरफटले असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे तरुणी देखील मॅफेड्रॉनचे अॅडिक्ट असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात विविध कामानिमित्त परप्रांतीय तरुणांची ये-जा असते. उत्तर व दक्षिण भारतामध्ये मॅफेड्रॉन अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे जिल्ह्यात विविध कामानिमित्त येणारे परप्रांतीय गावाहून येताना मॅफेड्रॉन घेऊन येत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडून केवळ शे-पाचशे रुपयांना मॅफेड्रॉनची पुडी विकली जात असल्याचे देखील समोर आले आहे. मुंबई, पणजी आणि बेंगलोर ही तीन शहरे मॅफेड्रॉनच्या व्यापारासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. तेथूनही ते सांगलीत येत असल्याची शक्यता आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल असल्याने मॅफेड्रॉनची तस्करी करणारी टोळी देखील कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. मॅफेड्रॉनची तस्करी करणारे रॅकेट सध्या शहरासह ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहे. या टोळीकडून एक नेटवर्क उभे करण्यात आले आहे. ज्याला मॅफेड्रॉन पाहिजे तो संबंधित एजंटाशी संपर्क साधतो. त्याच्यामार्फत हे अंमली पदार्थ 'मागणी तसा पुरवठा' या तत्त्वावर पुरविला जात आहेत. इतर अंमली पदार्थाच्या तुलनेत मॅफेड्रॉन हे स्वस्त मिळते. तसेच गांजाच्या तुलनेत अधिक नशा आणि स्टॅडंर्ड लाईफस्टाईल समजले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक उच्चभू्र घराण्यातील तरुण-तरुणी देखील मॅफेड्रॉनचे अॅडिक्ट झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील सधन भाग सध्या 'उडता पंजाब'च्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे भयावह दृश्य दिसून येत आहे.
महागड्या अंमली पदार्थांचा देखील शौक
अंमली पदार्थांमध्ये हेरॉईन, ब्राऊन शुगर, सिंथेटिक ड्रग, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन यांचा समावेश होतो. या अंमली पदार्थांची आयात प्रामुख्याने परदेशातून करण्यात येते. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप आणि इंजेक्शनच्या रूपात हे अंमली पदार्थ उपलब्ध होतात. हे अंमली पदार्थ महागडे असलेतरी उच्चभ्रू वर्गातील अनेक युवक या महागड्या अंमली पदार्थांचा शौक करताना दिसतात. परंतु असे असलेतरी उच्चभ्रू कुटुंबातील तरुणांसह सर्वसामान्य कुटुंबातील मुले मात्र स्वस्तात मस्त मानल्या जाणार्या मॅफेड्रॉनच्या आहारी जाताना दिसत आहेत.
ही आहेत मॅफेड्रॉन अॅडिक्टची लक्षणे
मॅफेड्रॉन अॅडिक्ट झालेल्या व्यक्तीची झोप व भूक कमी होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात, कायम चिडचिड होते, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी, अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येवून धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. तसेच मॅफेड्रॉनचे सेवन केलेल्या व्यक्तीकडून प्रचंड रागराग करण्यात येतो. प्रसंगी ते रागाच्या भरात कोणावरही हल्ला करू शकतात.