जुलैमध्ये 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये ‘जीएसटी’ संकलन | पुढारी

जुलैमध्ये 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये ‘जीएसटी’ संकलन

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा देशात जुलै महिन्यात 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलित करण्यात आला. विशेष म्हणजे जुलै महिन्यातील जीएसटी महसूल संकलन हे आतापर्यंतचे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक आणि जुलै 2021 च्या तुलनेत 28 टक्क्यांनी अधिक असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. जुलै महिन्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून सर्वाधिक 22 हजार 129 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. जुलै 2021 च्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात 17 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

गोवा राज्याचे जीएसटी संकलनही यंदा वाढले. जुलै 2021 च्या तुलनेत यंदा राज्याच्या जीएसटी संकलनात 43 टक्क्यांची वाढ होऊन 433 कोटी रुपयांचा जीएसटी संकलित करण्यात आला. देशातील एकूण संकलित जीएसटीपैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा (सीजीएसटी) 25 हजार 751 कोटी असून राज्याचा वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) हिस्सा 32 हजार 807 कोटी रुपये आहे. आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा हिस्सा 79 हजार 518 कोटी रुपये आहे. उपकराच्या माध्यमातून 10,920 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. जुलै 2022 मधील जीएसटी महसूल जुलै 2021 मधील 1 लाख 16 हजार 393 कोटींच्या तुलनेत 28 टक्क्यांनी अधिक आहे.

जुलै महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 48 टक्क्यांनी अधिक होता. तर, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) प्राप्त महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 22 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने मासिक जीएसटी महसूल संकलन 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असून महसूल संकलन दर महिन्याला भक्कम वाढ दर्शवत आहे. जुलै 2022 पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Back to top button