शशी थरूर म्हणतात तालिबान संघटनेत दोन भारतीयांचाही समावेश | पुढारी

शशी थरूर म्हणतात तालिबान संघटनेत दोन भारतीयांचाही समावेश

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : अफगाणिस्तानवर तालिबान्यानी कब्जा केला. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोठा खुलासा केला आहे. अफगाणीस्तानवर कब्जा करण्यामध्ये दोन भारतीयांचाही समावेश असल्याचे शशी थरूर म्हणाले. हे दोन्ही व्यक्ती केरळचे रहिवासी आहेत आणि दोघेही मल्याळम भाषेत बोलतात.

तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी एक व्हिडिओ ट्वीट केले ज्यात हे दोघे हातात बंदुका धरून आहेत आणि ते मल्याळी बोलत आहेत. व्हिडिओ शेअर करताना शशी थरूर म्हणाले, ‘हे ऐकून असे वाटते की तेथे दोन मल्याळी तालिबानही उपस्थित आहेत. त्यापैकी एक ८ सेकंद मल्याळम बोलला आणि दुसरा त्याला ऐकत आहे.

व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की काबुलच्या बाहेरील भागात पोहोचल्यावर एक तालिबानी रस्त्यावर बसून आनंद व्यक्त करत असतो. यात समोरची व्यक्ती तिला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. हाच व्हिडीओ शशी थरूर यांनी शेअर करत माहिती दिली.

तालिबान म्हणजे काय?

पश्तू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो. अफगाणिस्तानातून सोव्हिएट सैन्याने माघार घेतल्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. धार्मिक समारंभातून तालिबानचा उदय झाला,  असं मानलं जात. कडवट सुन्नी इस्लामचा प्रचार करणाऱ्या या सभांना सौदी अरेबियातून पैसा मिळत होता.

सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबान देत होतं.

१९९५ला तालिबानने अफगाणिस्तानातील हेरात हा प्रांत ताब्यात घेतला, त्यानंतर एकाच वर्षात त्यांनी काबूल ताब्यात घेतलं.

१९९८पर्यंत जवळपास ९० टक्के अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेला.

तालिबानने शरियत कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती. पुरुषांना दाढी ठेवणं, महिलांना बुरखा सक्ती करण्यात आली होती.

टीव्ही, संगीत, सिनेमा, १० वर्षांवरील मुलींच्या शिक्षणाला बंदी असे बरेच कायदे करण्यात आले.

२००१मध्ये मध्य अफगाणिस्तानातील बमियान बुद्धाच्या प्राचीन मूर्ती पाडण्यात आल्याने त्याचा जगभरात निषेध झाला होता.

तालिबानच्या निर्मिती मागे काही हात नसल्याचं पाकिस्तानने वारंवार म्हटलं असलं तरी तालिबानच्या चळवळीत सहभागी बहुतांश युवक हे पाकिस्तानातील मदरशामध्‍ये शिकलेले होते.

तालिबानच्या सत्तेला मान्यता देणाऱ्या जगातील ३ देशांपैकी पाकिस्तान एक होतं. नंतर तालिबानचा पाकिस्तानला धोका निर्माण झाला हा भाग वेगळा.

२०१२मध्ये मलाला युसूफझाई या शालेय मुलीवर तालिबानने गोळीबार केल्यानंतर त्याचे पडसाद जगभरात उमटले होते.

अल-कायदाला पाठबळ

११ सप्टेंबर २००१ राेजी अल-कायदाने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. अल-कायदा आणि ओसामा बिन लादेन याला आश्रय देणारे तालिबानचं होते.

७ ऑक्टोबर २००१ राेजी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्ताची मोहीम हाती घेतली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तालिबानचा पाडाव झाला. तालिबानचा म्होरक्या मुल्ला मोहम्मद ओमर आणि अल-कायदाचा म्होरक्या लादेन यांनी अफगाणिस्तानमधून पलायन केलं.

असं मानलं जातं की, तालिबानच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा या शहरात आश्रय घेतला. तेथून ते तालिबानचा कारभार चालवत होते.

Back to top button