मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न दिल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना पुन्हा एकदा चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले आहे. ईडीने अनिल देशमुख यांना बजावलेले पाचवे समन्स असून त्यांना बुधवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईतील बार, हॉटेल्स आणि ऑक्रेस्ट्रा मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे भ्रष्टाचाराचे आणि गैर कारभाराचे गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते.
या आरोपांवरुन आधी सीबीआयने आणि त्यानंतर ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन धडक कारवाई सुरु केली आहे.
ईडीने देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली. त्यानंतर ईडीने देशमुख यांना तीन वेळा तसेच, मुलगा ऋषीकेश आणि देशमुख यांच्या पत्नी आरती यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले.
ईडीने बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतर देशमुख नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी चौकशीला हजर न राहता ईडी कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वत: ईडीसमोर जबाब नोंदवायला जाणार असल्याचे देशमुख यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून देशमुख यांना दिलासा न देता सुनावणी पुढे ढकलल्याने ईडीने देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आरती आणि मुलगा ऋषीकेश यांना 02 ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
यावेळीही देशमुख कुटुंब चौकशीला हजर राहिले नाही.
अखेर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी देशमुख यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीने त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याआधीही त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते.
ईडीने बजावलेल्या समन्सला देशमुख कसे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :