तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? सीएम ममता भडकल्या | पुढारी

तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? सीएम ममता भडकल्या

कोलकाता : पुढारी ऑनलाईन

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पश्चिम बंगालमध्ये धाडण्याच्या केंद्राच्या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या आहेत. तुम्ही आत्तापर्यंत ऑक्सिजन आणि इतर सुविधांसाठी पथके का पाठवली नाहीत? आम्हाला आमचे काम करू द्या, जनतेचा कौल मान्य करा, असे सुनावत केंद्रीय मंत्री बंगालमध्ये येऊन दंगली भडकवत आहेत, असा आरोप केला.

वाचा : कर्नाटकला १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

बॅनर्जी म्हणाल्या, ‘आपसात भांडत बसण्यात आम्हाला स्वारस्य नाही. बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि सायंकाळी सात वाजता केंद्र सरकारचे एक पत्र आम्हाला मिळाले. त्यात लिहिले होते, गुरुवारी सकाळी केंद्रीय पथक बंगालमध्ये येत आहे. हे पथक ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याबाबत माहिती घेईल का?’ 

त्या पुढे म्हणाल्या, ‘हे केंद्रीय पथक हाथरस सामूहिक अत्याचारासारख्या प्रकरणांचा, दिल्ली आणि उत्तरप्रदेशात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात इतकी तत्परता दाखवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. प. बंगालमधील निकालानंतर झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या १६ जणांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मला माहीत आहे की या पैशातून त्यांचा माणूस परत येणार नाही. पण त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. सध्या केंद्र सरकार आणि भाजपला चांगल्या विचारांची गरज आहे.’

वाचा : लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातही वर्गवारी, राजेश टोपे यांची माहिती

‘भाजपचे मुख्यमंत्री माझ्याविरोधात बोलत आहेत’

भारतीय जनता पार्टीचे सगळे मुख्यमंत्री माझ्याविरोधात बोलत आहेत, असा आरोप करत त्या म्हणाल्या, आसाममधील भाजपचे नेते म्हणत आहेत की, बंगालमध्ये त्रस्त झालेले नागरिक आसाममध्ये येत आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, जेव्हा आसाममध्ये अशांतता माजते तेव्हा तेथील लोक बंगालमध्ये पळून येतात. कुचबिहारमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. जेथे भाजप जिंकली आहे तेथे जास्त हिंसा झाली आहे.’ 

वाचा : ‘पंतप्रधानांनी काम की बात केली असती तर बरे झाले असते’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट

Back to top button