कोगनोळी तपासणी नाक्यावर केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश | पुढारी

कोगनोळी तपासणी नाक्यावर केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश

कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर कोगनोळीनजीक असलेल्या कोरोना तपासणी नाक्यावर सोमवारपासून कर्नाटकात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून कडक पोलिस यंत्रणा तैनात केली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तपासणी नाक्यावर सुरुवातीपेक्षा अधिक पोलिसांचा ताफा तैनात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्वच वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून तपासणी नाक्यावर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सोमवारपासून कडक लॉकडाऊन जारी केल्याने तपासणी नाक्यावर कसून चौकशी सुरू झाली आहे. पोलिस खाते, महसूल विभाग, आरोग्य विभागातर्फे रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातून येणाऱ्या चारचाकी वाहनांना कर्नाटकात प्रवेश नाकारला जात आहे.

रुग्णवाहिका, तपासणीसाठी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. पोलिस अधिकारी, उपनिरीक्षक, होमगार्ड, महसूल विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

कामाव्यतिरिक्त प्रवेश करू नये

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार तपासणी कडक केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय प्रवासाचे निमित्त करून कर्नाटकात प्रवेश करू नये, असे आवाहन पोलिस खात्यातर्फे करण्यात आले आहे. 

Back to top button