‘पीएम आणि पीएम केअरमधील व्हेंटिलेटर एकसारखेच’ | पुढारी

'पीएम आणि पीएम केअरमधील व्हेंटिलेटर एकसारखेच'

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ( दि. १७ ) पीएम केअरमधील बंद असलेल्या व्हेंटिलेटरवरून पीएम मोदींवर टीका केली. अनेक ठिकाणी पीएम केअरमधून खरेदी करण्यात आलेले व्हेंटिलेटर काम करत नसल्याने धूळ खात पडले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वीच त्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यावरुन राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी नरेंद्र मोदी आणि पीएम केअर मधून आणलेले व्हेंटिलेटर्स यांची तुलना करत दोघांचाही खोटा गाजावाजा झाला असल्याचे म्हटले. 

राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ‘पीएम केअर व्हेंटिलेटर आणि स्वतः पीएम यांच्या समानता आहे. दोघांच्या बाबतीतही अती प्रमाणात केलेला खोटा प्रचार, दोघेही आपल्याले नेमुन दिलेले काम करत नाही, ज्यावेळी गरज असते त्यावेळी कधी दिसत नाहीत.’ 

पीएम केअर फंडातून आणलेले व्हेंटिलेटर तांत्रिक बिघाडामुळे वापराविना पडून असल्याचे अनेक राज्यात दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वीच देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राने देलेल्या व्हेंटिलेटरचे त्वरित ऑडिट करण्याचे आदेश केले होते. पण, अजून पर्यंत कॅग हे ऑडिट करणार आहे का याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण पंतप्रधान कार्यालयाने पीएम केअर कॅगच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगितले आहे. 

राहुल गांधी हे सातत्याने पीएम मोदी कोरोना महामारी हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका करत आहेत. रविवारी केंद्रावर टीका करणारे पोस्टर दिल्लीत लावण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. यावरुन राहुल गांधी यांनी सरकावर निशाना साधला होता. त्यांनी तेच पोस्टर ट्विटवर शेअर करत आम्हालाही अटक करून दाखवा असे आव्हान दिले होते. 

याचबरोबर राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात ‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसारखे पंतप्रधानही गायब आहे. आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवरील जीएसटी आणि इकडे तिकचे पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत.’ अशी बोचरी टीका करणारे ट्विट केले होते.

Back to top button