राज्यसभेत महिला कमांडो आणता ही कसली मर्दुमकी? : संजय राऊत यांची टीका
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेत काल गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेत सुरु असलेला गोंधळ रोखण्यासाठी महिला कमांडोज बोलवण्यात आले होते. याच मुद्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
राज्यसभेमध्ये खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना आणता ही कसली मर्दुमकी? अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
माध्यमांशी बाेलताना खासदार संजय राऊत म्हणाले, मार्शल बोलावणे ही काही नवीन गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही मार्शल बोलावले जातात; पण एखादी दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही. तेव्हा सैन्याला बोलावले जाते तसे बंदुका घेऊन सैन्य बोलावले गेले.
भारत-पाकिस्तानच्या सीमेवरही असे सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला मार्शल कमांडो होत्या, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
घटनादुरुस्ती विधेयक : सर्वपक्षीयांकडून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची एकमुखी मागणी
राज्यांना इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचा अधिकार देणारे १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. लोकसभेने मंगळवारी त्याला मंजुरी दिली होती.
राज्यसभेत सर्वच सदस्यांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला. त्याबरोबरच आरक्षणाची सध्याची ५० टक्क्यांची मर्यादा वाढविली तरच या निर्णयाचा लाभ होऊ शकेल; अन्यथा ते निरर्थक ठरेल, असे मत अनेक सदस्यांनी या विषयावरील चर्चेत व्यक्त केले.
५० टक्क्यांची मर्यादा हटवा : खा. संभाजीराजे
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिले होते. २००७ पासून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरू आहे. ५० टक्क्यांची मर्यादा उठवल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य नाही, असे खासदार संभाजीराजे यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.

