Indo-US Trade : चीनला मागे टाकत अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार | पुढारी

Indo-US Trade : चीनला मागे टाकत अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सरत्या आर्थिक वर्षात म्हणजे 2021-22 मध्ये चीनला मागे टाकत अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार  (Indo-US Trade) बनला आहे. 2021-22 आर्थिक वर्षात दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार 119.42 अब्ज डॉलर्सवर गेल्याची माहिती व्यापार मंत्रालयाकडून देण्यात आली. तत्पूर्वीच्या कोरोना प्रभावित वर्षात (वर्ष 2020-21) दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार 80.51 अब्ज डॉलर्स इतका होता.

भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक सहकार्य (Indo-US Trade)  गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झालेले आहे. याच्या परिणामी दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार उदीम झपाट्याने वाढत आहे. वर्ष 2021-22 मध्ये भारताकडून अमेरिकेला 51.62 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 76.11 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. दुसरीकडे अमेरिकेहून देशात 29 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 43.31 अब्ज डॉलर्सची आयात झाली. सरत्या आर्थिक वर्षातील चीनसोबतच्या व्यापारावर नजर टाकली तर दोन्ही देशांदरम्यान 115.42 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. तत्पूर्वीच्या वर्षात हा आकडा 86.4 अब्ज डॉलर्स इतका होता.

भारताची चीनसोबतची व्यापार तूट प्रचंड प्रमाणात आहे. वर्ष 2021-22 मध्ये भारतातून चीनला 21.18 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत केवळ 21.25 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. दुसरीकडे आयात 65.21 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत वाढून 94.16 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. चीनसोबतची व्यापार तूट आता 44 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 72.91 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. चीनसह इतर देशांवरील आयातीची भिस्त कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र, असे असले तरी चीनहून होणारी आयात कमी होण्याची कोणतीही चिन्हे आकडेवारीतून दिसून येत नाहीत. अमेरिकेने अलीकडेच इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्कची (आयपीईएफ) स्थापना केली असून, भारत या गटात सामील झालेला आहे. यामुळे अमेरिकेसोबतच्या व्यापार संबंधांना आणखी चालना मिळेल, असा केंद्र सरकारचा विश्वास आहे.

अमेरिका आणि चीनपाठोपाठ संयुक्त अरब अमिरात हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार 72.9 अब्ज डॉलर्स इतका आहे. चौथ्या क्रमांकावर सौदी अरेबिया (42.85 अब्ज डॉलर्स), पाचव्या क्रमांकावर इराक (34.33 अब्ज डॉलर्स) तर सहाव्या क्रमांकावर सिंगापूर (30 अब्ज डॉलर्स) हे देश आहेत.

हेही वाचलंत का ?  

Back to top button