पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL is Dangerous : इंडियन प्रीमियर लीग (IPL) संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मोठे विधान केले आहे. आयपीएलसारख्या टी-20 लीग आयोजित करण्याचा कालावधी वाढल्यास आंतरराष्ट्रीय संघांमधील द्विपक्षीय मालिका कमी होऊ शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका निर्माण झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या विधानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दोन नवीन संघांच्या समावेशानंतर आयपीएलच्या चालू हंगामात एकूण 74 सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्या आधीच्या म्हणजे IPL 2021 मध्ये याच सामन्यांची संख्या 60 होती.
ग्रेग बार्कले यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आयपीएल सारख्या स्पर्धा त्या-त्या देशांच्या अखत्यारीत असतात. ते त्यांना हवे तसे आयोजित करू शकतात. परंतु सामन्यांची संख्या वाढणे ही स्पर्धा लांबवणे यामुळे आंतरराष्ट्रीय संघांमधील द्विपक्षीय सामने कमी होतील.
आयसीसी अध्यक्षांनी मात्र आयपीएलचे कौतुक केले आणि ही किफायतशीर टी-20 लीग आपल्याला आवडते असे सांगितले. ते म्हणाले, 'गेली दोन वर्षे मला प्रवास करता आला नाही. पण भारतात येणे खूप छान आहे आणि माझी आयपीएलची ही पहिलीच ट्रिप आहे. मला आयपीएल आवडते जी एक उत्तम स्पर्धा आहे. मला वाटते की भारत आणि बीसीसीआयने क्रिकेटमध्ये काहीतरी आश्चर्यकारक केले आहे. ही एक स्पर्धा आहे जी पाहणे आणि त्याचा भाग असणे अभिमानास्पद आहे. (IPL is Dangerous)
ग्रेग बार्कले पुढे म्हणाले, बीसीसीआयने आयपीएलचे मीडिया अधिकार जारी केल्यानंतर, आयसीसी 2024-2031 हंगामासाठी मीडिया हक्कांसाठी निविदा काढेल. मला वाटते की असे काही भागीदार आहेत जे आयसीसी सोबत काम करू शकतील आणि ते क्रिकेटच्या विकासात सकारात्मक भूमिका बजावू शकतील, असेही त्यांनी सांगितले. (IPL is Dangerous)