तिसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी एक लाख वॉरियर्स; पंतप्रधानांच्या हस्ते महाअभियानाची सुरुवात | पुढारी

तिसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी एक लाख वॉरियर्स; पंतप्रधानांच्या हस्ते महाअभियानाची सुरुवात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एक लाख वॉरियर्सना प्रशिक्षित केले जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली. २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये कोविड-१९ हेल्थकेयर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी विशेष प्रशिक्षण अर्थात क्रॅश कोर्सचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

वाचा : मान्सून! अतिवृष्टीचे दिवस वाढले; तर हलका, मध्यम पाऊस झाला कमी, काय कारण आहे यामागे?

आगामी काळात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अतिशय सावधपणे आपल्याला तयारी करावी लागणार आहे. या दृष्टीने एक लाख फ्रंटलाईन कोरोना वॉरियर्स तयार करण्याच्या महाअभियानास सुरुवात करण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले. कोरोना रूप बदलून कसे थैमान घालत आहे, हे दुसऱ्या लाटेवेळी आपण पाहिले. कोरोना विषाणू अजूनही आपल्यात आहे आणि त्याची म्यूटेड म्हणजे रूप बदलण्याची शक्यता आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 

कोरोना महारोगराईने विज्ञान, सरकार, समाज, संस्था तसेच व्यक्ती अशा प्रत्येक घटकाला आपल्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी सतर्क केले आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, ‘कोरोनाचा सामना करत असलेल्या विद्यमान फोर्सला सपोर्ट करण्यासाठी एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात युवकांना क्रॅश कोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. या अभियानामुळे कोविडशी मुकाबला करीत असलेल्या आरोग्य क्षेत्रातील फ्रंटलाईन फोर्सला नवीन ऊर्जा प्राप्त होईल. युवकांना त्यामुळे रोजगारदेखील मिळणार आहे. गेल्या सात वर्षाच्या काळात नवीन एम्स, नवे मेडिकल कॉलेजेस, नर्सिंग होम्स यांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.’ 

वाचा : … तर भविष्यात लोकशाहीवर वाईट दिवस येतील ः दिल्ली न्यायालय

नवीन फ्रंटलाईन वर्कर्सच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना मोफत प्रशिक्षण, स्किल इंडियाचे सर्टिफिकेट, भोजन वनिवास सुविधा, कामावर असताना स्टायपेंड तसेच प्रमाणित उमेदवारांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली. दुर्गम भाग, खेडेगाव, डोंगराळ भाग तसेच आदिवासी क्षेत्रात लसीकरण अभियान राबविण्यात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, एएनएम तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.

वाचा : ‘पीयूसी’साठी वाहन चालकाचा मोबाईल क्रमांक अनिवार्य!

Back to top button