मला बनावट लसीकरण केंद्रावर बनावट लस दिली! महिला खासदाराचा गंभीर आरोप | पुढारी

मला बनावट लसीकरण केंद्रावर बनावट लस दिली! महिला खासदाराचा गंभीर आरोप

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : एका व्यक्तीने तथाकथित आयएएस अधिकारी असल्याचे भासवले आणि कोलकातामध्ये हजारो लोकांचे लसीकरण केले. त्या व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली आहे. याविषयी तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी मोठा खुलासा केला आहे. ते लसीकरण शिबीर बाेगस होतं. यात खुद्द मी लस घेतली, ती लस बनावट होती, असे त्यांनी म्हटलं आहे. आता या शिबिरात शेकडो लोकांना देण्यात आलेली लस खरी होती की नाही, या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. 

अधिक वाचा- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; जीडीपी दर ११ टक्क्यांऐवजी ९.५ टक्क्यांवर राहणार, ‘एस अँड पी’चा अंदाज

लस घेतल्यानंतर जेव्हा मिमी चक्रवर्ती यांना कुठलीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दक्षिण कोलकातामध्ये अटकेतील व्यक्ती देबंजन देवद्वारा आयोजित लसीकरण शिबिरात मिमी चक्रवर्ती मुख्य पाहुणे म्हणून गेल्या होत्या आणि त्यांनी स्वत: तेथे लस घेतली होती. 

मिमी म्हणाल्या, या शिबिरात त्यांनी लोकांनीही लस घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी लस टोचून घेतली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, शिबिरात जवळपास २५० लोकांना लस देण्यात आली होती. देबंजन देवने एक आयएएस अधिकारी होण्याचा दावा करत खासदार मिमी यांना लसीकरण शिबिरात निमंत्रित केलं होतं. तो म्हणाला होता की, लसीकरण कोलकाता महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आले होते. 

लोकसभा खासदार मिमी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “त्या बनावट आयएएसने ट्रान्सजेंडर आणि विशेष अपंग व्यक्तींसाठी एक विशेष अभियान सुरू केल्याचे सांगितले. आणि त्यासाठी त्यांची अतिथी म्हणून यावे, अशी विनंती केली होती.”

अधिकृत लस घेतल्याची कुठलीही माहिती नाही 

मिमी म्हणाल्या, “लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी मी शिबिरात कोविशील्डची लस घेतली. परंतु, मला CoWIN कडून लस घेतली असल्याची पुष्टी करणारा एकदेखील संदेश मिळाला नाही.” 

Back to top button