कर्मचार्‍याची कारकुनी चूक बँकेला पडली महागात! १.५ कोटी चुकीने झाले ट्रान्सफर, १५ जणांना मिळाले प्रत्येकी १० लाख - पुढारी

कर्मचार्‍याची कारकुनी चूक बँकेला पडली महागात! १.५ कोटी चुकीने झाले ट्रान्सफर, १५ जणांना मिळाले प्रत्येकी १० लाख

पुढारी ऑनलाईन डेस्क

आपण माणूस आहोत यंत्र नाही, हे सत्य आहे. यामुळे आपल्याकडून काहीतरी चूक होणारच. पण जेव्हा काही चुकांमुळे मोठी समस्या निर्माण होते तेव्हा कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करायला पाहिजे. हल्लीच, एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्याचा कारकुनी चुकीमुळे मोठा गोंधळ झाला. एका रिपोर्टनुसार, कर्मचार्‍याच्या चुकीमुळे तेलंगणा सरकारचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या दलित बंधू योजनेसाठी ठेवलेल्या निधीचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले.

अनुसूचित जाती कुटुंबासाठी १० लाख रुपये एकरकमी भांडवली मदत पुरविण्याचे या विशेष योजनेचे उद्दिष्ट आहे. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही योजना अनुसूचित जातीच्या कुटुंबांना उत्पन्नाचे योग्य स्रोत निर्माण करण्यासाठी १०० टक्के अनुदान देते. पण या योजनेचा निधी बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे भलत्याच व्यक्तींच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाला आहे.

या योजनेचा निधी बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे लोटस हॉस्पिटलच्या १५ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार म्हणून १.५० कोटी रुपये ट्रान्सफर झाला. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा झाले. यानंतर चुकीच्या लाभार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोळ लक्षात येताच तेलंगणातील एसबीआयच्या रंगारेड्डी जिल्हाधिकारी कार्यालय शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही चूक कबूल केली. त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना चुकून ट्रान्सफर झालेली रक्कम परत करण्यास सांगितले.

मीडिया रिपोर्ट्नुसार, १५ पैकी १४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत केले. परंतु महेश नावाच्या एक व्यक्तीशी फोनवर संपर्क झाला नसल्याने त्याच्याकडून संपूर्ण रक्कम परत मिळालेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महेशने असे गृहीत धरले की त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केले आहेत आणि म्हणून त्याने त्याचे कर्ज फेडण्यासाठी यातील काही रक्कम बँक खात्यातून काढून घेतली.

वारंवार विनंती करूनही महेशने पैसे परत केले नसल्याचे ‘द हिंदू’ने वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर बँक अधिकाऱ्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या चुकीबद्दल बँक कर्मचाऱ्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. आतापर्यंत महेशच्या खात्यात हस्तांतरित झालेल्या १० लाख रुपयांपैकी ६.७० लाख रुपये परत मिळवण्यात बँक अधिकाऱ्यांना यश आले आहे. उर्वरित ३.३० लाख रुपये त्याने एसबीआयला परत करायचे आहेत.

हे ही वाचा :

Back to top button