राज्य बँक २५ वर्षांसाठी कारखाने देणार भाडेतत्त्वावर | पुढारी

राज्य बँक २५ वर्षांसाठी कारखाने देणार भाडेतत्त्वावर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : थकबाकीमुळे सध्या राज्य बँकेच्या ताब्यात असलेले राज्यातील दहा सहकारी साखर कारखाने पंचवीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांकडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची सुमारे अकराशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापूर्वी काही साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे सहकार क्षेत्रातून टीका होऊ लागल्याने यापुढे साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यानुसार दहा सहकारी साखर कारखाने पंचवीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे. त्यासोबत एक सूतगिरणी आणि लातूर जिल्ह्यातील तालुका शेतकरी दाल मिल प्रक्रिया संस्था विक्रीस काढण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

गंगापूर सहकारी साखर कारखाना लि., रघुनाथनगर, तालुका-गंगापूर, जिल्हा-औरंगाबाद यांच्याकडे 87 कोटी 19 लाख रुपये थकबाकी आहे. तर विनायक सहकारी साखर कारखाना लि., वैजापूर, जि.-औरंगाबाद 57 कोटी 2 लाख, जिजामाता सहकारी साखर कारखाना लि., दुसरबीड, ता.-सिंदखेडराजा, जि.-बुलडाणा, 79 कोटी 35 लाख, गजानन सहकारी साखर कारखाना लि., सोनाजीनगर, जि.-बीड 91 कोटी 55 लाख, महेश (कडा) सहकारी साखर कारखाना लि., ता.-आष्टी, जि.-बीड 33 कोटी 61 लाख, शिवाजीराव पाटील-निलंगेकर ससाका लि., अंबुलगा, जि.-लातूर 252 कोटी 68 लाख, देवगिरी ससाका लि., फुलंबी, जि.-औरंगाबाद 41 कोटी 64 लाख, बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना लि., वेळा, ता.-हिंगणघाट, जि.-वर्धा 164 कोटी 66 लाख, जयकिसान सहकारी साखर कारखाना लि., बोदेगाव, ता.- दारव्हा, जि.-यवतमाळ 229 कोटी 44 लाख, दत्ताजीराव कदम सहकारी सूतगिरणी लि., कौलगे, ता.-गडहिंग्लज, जि. -कोल्हापूर 10 कोटी 91 लाख, तर जय जवान जय किसान ससाका लि., नळेगाव, जि.-लातूर 84 कोटी 41 लाख रुपये थकबाकी आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका शेतकरी दाल मिल प्रक्रिया या संस्थेची थकबाकी 4 कोटी 86 लाख रुपये आहे.

कारखाने भाड्यावर देण्याचे निकष

  • भाडेतत्त्वावर देण्यात येणारे कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. एखाद्या संस्थेने ते घेतल्यास त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खर्च येणार असल्यामुळे त्यांच्या खर्च वसुलीसाठी कारखाना 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येतील.
  • एखादा कारखाना गाळप करो अथवा न करो, त्याच्याकडून निर्धारित भाडे घेऊ.
  • गाळपाच्या प्रत्येक टनामागे 100 रुपये भाडे आकारले जाईल.
  • डिस्टिलरी असल्यास लिटरमागे 2 रुपये आकारले जातील.
  • सहवीजनिर्मिती प्रकल्पालासुद्धा भाड्याचे निकष लावले जातील.

Back to top button