गुंतवणूक : आर्थिक नियोजनासाठी वाचा ‘हे’ चार स्तंभ | पुढारी

गुंतवणूक : आर्थिक नियोजनासाठी वाचा 'हे' चार स्तंभ

चार स्तंभ आर्थिकद़ृष्ट्या फार महत्त्वाचे आहेत. पहिले तीन स्तंभ तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देतात. आणि चौथा स्तंभ कुटुंबाच्या मोठ्या आर्थिक गरजा कमी रकमेमध्ये पार पाडतो. परंतु हे चार स्तंभ उभे करण्यासाठी कुटुंबाच्या आर्थिक धोरणावर काम करणारा चांगला आर्थिक नियोजनकार हवा, जो तुमच्यासाठी काम करेल. दरमहा कुटुंबात पैसा येतो, तो कुटुंबातील वेगवेगळ्या गरजेवर आणि इतर गोष्टींवर खर्च होतो अन् थोड्याफार प्रमाणात बाकी शिल्लक राहतो. आपल्या कुटुंबात दरमहा येणार्‍या उत्पन्नाच्या प्रमाणात किती पैसा शिल्लक राहतो? किती प्रमाणात बचत करतो? एकूण बचतीपैकी किती टक्के गुंतवणूक करतो?

ही गोष्ट कुटुंब प्रमुखाच्या द़ृष्टीने फार महत्त्वाची आहे. यावरून त्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य ठरत असते. त्यासाठी कुटुंबात आर्थिक शिस्त हवी. किमान 30% शिल्लक बचत झाली पाहिजे व ती योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. अनेक कुटुंबांतील केलेली बचत बँकेच्या सेव्हिंग खात्यामध्ये वर्षानुवर्षे तशीच ठेवली जाते. तर ही बाब पूर्णतः चुकीची आहे. कारण इथे पैसा वाढत नाही, उलट महागाई तुमचा पैसा खाते. वाढत्या महागाईमुळे इथल्या पैशाचे मूल्य कमी होते. सेव्हिंग खात्यावर 3% व्याज मिळते अन् महागाई वाढते 7 ते 8%. म्हणजेच बचत खात्यात पैसे ठेवल्याने प्रतिवर्षी 5% नुकसान होते. हे लक्षात घेतले पाहिजे.

आज पैशाबद्दल घेतलेले काही निर्णय हे आपल्याला भविष्यात गरिबीकडे घेऊन जातात, तर योग्य निर्णय श्रीमंतीकडे घेऊन जातो म्हणून आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला सल्लागार ठेवा. जो सल्लागार फक्त तुमच्या आयुष्यातील गरजांचा विचार करेल व आर्थिक नियोजनाद्वारे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक नियोजन करून निर्णय घेईल.

जेव्हा आपण सुंदर घराचे स्वप्न पाहतो, तेव्हा ते घर प्रथम मनात आकार घेते. मग इंजिनिअरच्या माध्यमातून कागदावर येते आणि मगच ते सत्यात उतरत असते. जेव्हा आपण इंजिनिअरला भेटतो; तेव्हा तो इंजिनिअर घरासाठी उपलब्ध जागा, कुटुंबाची गरज, आर्थिक बजेट या सर्व गोष्टींचा विचार करून प्रथम आराखडा तयार करतो. आणि जेव्हा घर बांधायला सुरुवात करतो तेव्हा तो प्रथम त्या घराचा पाया मजबूत करतो. त्यामध्ये किमान चार कॉलम प्रथम उभे करतो, जे घराला मजबूत करतात. या प्रक्रिया सुंदर घर साकार होण्यात असते. हाच नियम तुमचे कुटुंब समृद्ध करण्यासाठी लागू होतो. ‘टीप-हीप-पीप’ हे तीन स्तंभ अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबाला आर्थिक नुकसानीपासून वाचवतात आणि कुटुंबाला आर्थिक मजबूत करतात. आणि चौथा स्तंभ तुम्हाला नियमित बचतीच्या सवयीने कुटुंबात आर्थिक समृद्धी निर्माण करतो.

1) टीप (Term Insurance Plan) – (जोखमीचा विमा) कुटुंबप्रमुख हा दिवसभर काम करून पैसा मिळवितो, त्या पैशातून कुटुंबातील सदस्यांचे पालन-पोषण करतो. जर अनपेक्षितपणे त्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला, तर घरात येणारे उत्पन्न बंद होते. पैशाअभावी कुटुंब उद्ध्वस्त होते. या गोष्टीवर मात करण्यासाठी टीप प्लॅन म्हणजेच जोखमीचा विमा हवा. अन् हा विमा कुटुंब प्रमुखाच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 15 पट हवा. समजा, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न पाच लाख असेल, तर त्याचा 75 लाखांचा टर्म प्लॅन हवा. एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या पश्चात त्या कुटुंबात 75 लाख येतील. सदर कुटुंब अन् त्याचे 7% व्याज दराने 5 लाख रु. वार्षिक उत्पन्न कायमस्वरूपी कुटुंबात येईल आणि कुटुंब आर्थिक सुरक्षित राहील. खरे तर, अनेक कुटुंबांत या प्रकारचा विमा स्वीकारला जात नाही कारण आयुर्विमा म्हणजे गुंतवणूक आहे, असा समज असतो. अशा योजनेत बोनस वगैरे काहीही रक्कम मिळत नाही. भरलेले पैसेही परत मिळत नाहीत. याकारणाने तो पाठ फिरवितो. इथे फक्त जोखमीचे पैसे दिले जातात म्हणून या ठिकाणी कमी रकमेमध्ये मोठी विमा रक्कम मिळते. हाच विमा कुटुंब प्रमुखाने घेतला पाहिजे.

2) हीप (Health Insurance Plan) – प्रत्येक कुटुंबप्रमुख दरमहा पैसे मिळवतो आणि बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करून भविष्यातील गरजांसाठी पैसे साठवित असतो; पण अनपेक्षित घटनेमुळे अपघात किंवा आजारपणासारखी गोष्ट कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत घडली, तर औषधोपचार व हॉस्पिटलसाठी मोठा खर्च करावा लागतो. अशा वेळी आपली पै पै करून जमवलेली शिल्लक क्षणात संपून जाते अन् भविष्य अंध:कारमय होते. कोव्हिडसारख्या आजारावर लाखो रुपये खर्च करावे लागले. असे अनेक आजार आहेत, ज्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. यासाठी पर्याय म्हणून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पुरेशी वैद्यकीय विमा मेडिक्लेम योजना हवी. या विम्यासाठी दिलेला हप्ता हा दैनंदिन खर्च आहे, असे समजावे. हा खर्च भविष्यासाठी ठेवलेल्या शिल्लक रकमेला संरक्षण देईल. आणि आपत्तीपासून आर्थिक नुकसान वाचवेल.

3) पीप (Personal Accidental Insurance Plan) – आज आपल्या देशामध्ये दर सेकंदाला चार अपघात होत आहेत. अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबप्रमुख किंवा इतर सदस्यांच्याबाबतीत जर अपघात घडला, तर वाईट प्रसंग निर्माण होतो. प्रसंगामुळे हॉस्पिटलसाठी मोठा खर्च करावा लागतो. अपघातामध्ये तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. अपंगत्वामुळे कुटुंबप्रमुख काम करू शकत नाही आणि त्या घरामध्ये, त्या कुटुंबांमध्ये येणारे उत्पन्न पैशाचा प्रवाह थांबतो. अशा वेळेला इतर सदस्यांचे पैशाअभावी पालन-पोषण कसे होणार? हा प्रश्न निर्माण होतो. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची पर्सनल एक्सिडेंटल इन्शुरन्स प्लॅन हा असायलाच हवा. ज्यामध्ये हॉस्पिटलचा खर्च, शरीराच्या अवयवाचे झालेले नुकसान किंवा कायमचे अपंगत्व आले, तर मोठ्या रकमेची गरज या प्लॅनमधून भागते. कुटुंबात वाईट काळ कधी सांगून येत नाही. त्याचे पूर्वनियोजन करणे ही काळाची गरज आहे. वरीलप्रमाणे किमान तीन प्रकारचे स्तंभ (विमा योजना) प्रत्येक कुटुंबात घेतले पाहिजेत. तरच ते कुटुंब सर्व अर्थाने आर्थिक सुरक्षित राहू शकते. कोणत्याही घटनेची आर्थिक मोठी झळ पोहचू शकत नाही. प्रथम या स्तंभाचा योग्य निर्णय घ्यावा. मगच गुंतवणूक सुरू करावी.

4) सीप (Systematic Investment Plan) – आपली बचत नुसती बँकेत किंवा पारंपरिक योजनेमध्ये गुंतवणूक करून चालणार नाही. त्यासाठी म्युच्युअल फंड क्षेत्र आकर्षक ठरत आहे. याठिकाणी 2400 हून अधिक योजना उपलब्ध आहेत. भविष्यातील गरजेनुसार अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा गरजांसाठी गुंतवणूक करता येते. प्रथम वाढत्या महागाईनुसार भविष्यातील कोणत्या वर्षी किती पैसे लागणार आहेत, त्याचा आराखडा तयार करावा. त्यानंतर गुंतवणूक योजनेमध्ये जोखीम समजावून घ्यावी. मगच एसआयपीच्याद्वारे गुंतवणूक केली पाहिजे.

अल्पकालीन गरजांसाठी, तीन ते पाच वर्षातील गरजांसाठी लागणारा पैसा डेट फंड, बँक एफडी किंवा डेट बॅलन्स फंड किंवा पोस्ट अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, जिथे सुरक्षितता असेल. जर तुम्हाला पाच ते आठ वर्षांसाठी पैसा लागणार असेल, तर बॅलन्स फंड, लार्ज कॅप फंड योजनेत गुंतवणूक करावी. पंधरा वर्षांनंतर लागणारी रक्कम दीर्घकालीन गुंतवणूक करताना मिड कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्जी कॅप फंड योजनेत गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडात आपल्या देशात 5.28 कोटी खातेदारांकडून दरमहा 12328 कोटी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक होत आहे. आज म्युच्युअल फंडमधील सीप सर्वात लोकप्रिय ठरलेले गुंतवणूक साधन ठरले आहे. गुंतवणूकदारांच्या बँक खात्यातून ठरावीक रक्कम नियमितपणे गुंतवणूक केली जाते. अशा ठिकाणी दीर्घकाळात 12% ते 20% पर्यंत अनेक योजनांनी परतावा दिला आहे. आज पारंपरिक गुंतवणूक 5% ते 7% पर्यंत दराने वाढत आहेत. या योजनांपेक्षा कितीतरी अधिक परतावा सीप माध्यमातून मिळाला आहे.

आजपर्यंत चांगला परतावाचे अनुभव आलेने सीप गुंतवणूक मध्यम लोकप्रिय ठरली आहे. या ठिकाणी चांगला परतावा ही जमेची बाजू असली तरी बाजाराची जोखीम असते, ज्यामुळे बाजारातील तेजी-मंदीनुसार गुंतवणूक मूल्य कमी अथवा जास्त होऊ शकते. ही बाब समजावून घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. आज पारंपरिक गुंतवणूक जिथे 7% पर्यंत परतावा मिळतो. महागाई वाढते 8% ने अन् पैसा वाढतो 7%, या फरकामुळे आपणास उणे परतावा मिळतो. परिणामी भविष्यातील गरजांचा ताळमेळ बसत नाही. हे खालील उदाहरणावरून लक्षात येईल.

 या व्यक्तीने दरमहा 5000/- रु. गुंतवणूक केली, तर 20 वर्षांत एकूण गुंतवणूक 12 लाख होते. पारंपरिक आयुर्विमा योजनेत 5% दराने 19.84 लाख होतील. पीपीएफ बँक वतीने 7% परतावा गृहीत धरला, तर 24.59 लाख होतील अन् म्युच्युअल फंडात 15% परतावा दर गृहीत धरून 64.46 लाख होतील. जिथे बाजारातील जोखीम स्वीकारल्यामुळे 40 लाखाहून अधिक संपत्ती निर्माण होते म्हणून बँक, पोस्ट आयुर्विमा या दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चालणार नाही, तर ती योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे.

योजनांची निवड करताना मागील परतावा पाहून गुंतवणूक करणे हे चुकीचे आहे. भविष्यात येणारे लहान मुलांचे शिक्षण, लग्न असो वा रिटायरमेंटसाठी जिथे मोठी रक्कम भासते व इथे वेळ भरपूर असतो. मोठी रक्कम निर्माण करण्यासाठी मोठी रक्कम देण्याऐवजी मोठा अवधी द्या अन् रक्कम छोटी द्या. चक्रवाढ व्याजाच्या शक्तीने छोट्या रकमेमध्ये मोठ्या वेळेत मोठी संपत्ती निर्माण होते. म्हणून जीवनात करिअरची सुरवात झाली की, आर्थिक नियोजन करून वयाच्या लवकर गुंतवणूक सुरुवात करून श्रीमंत होऊन जगता येते.

-अनिल पाटील

Back to top button