ड्रोन क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करणार : ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास | पुढारी

ड्रोन क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करणार : ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनूसार भारत २०३० पर्यंत जगातील ड्रोन हबचे नेतृत्व करेल” असा विश्वास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. यासंबंधी मंत्रालयाकडून नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासोबत धोरण आखणी सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

या क्षेत्रात तीन टप्प्यांमध्ये देश मार्गक्रमण करणार आहे. पहिल्या टप्प्यात धोरण लागू करण्यासंबंधी विचार करण्यात आला आहे. यासंबंधीचे धोरण तत्काळ लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएलआय’ योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे उत्पादन तसेच यासंबंधी सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. तिसऱ्या टप्प्यात मागणी निर्माण करण्यासंबंधी विचार केला जाईल. या कामात १२ मंत्रालयाच्या सेवा घेण्यात आल्या आहेत. ड्रोनची मागणी वाढवण्याच्या उपायावर या मंत्रालयाकडून काम केले जात असल्याचे शिंदे म्हणाले.

येत्या काही काळात देशाला सुमारे १ लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासेल, अशी माहिती देखील त्यांनी यानिमित्ताने दिली.
दोन ते तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर युवकांची मासिक ३० हजार रुपयांच्या पगारावर ड्रोन वैमानिक म्हणून नियुक्ती केली जाईल. येत्या काळात १ लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासेल. ही उत्तम संधी असल्याचे शिंदे म्हणाले. गतवर्षी शिंदे यांनी भारतीय ड्रोन उद्योग २०२६ पर्यंत १५ हजार कोटींच्या घरात पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला होता, हे विशेष.

हेही वाचलंत का ?

Back to top button