मराठा क्रांती मोर्चा : सोमवारी पुण्यात बैठक, संभाजीराजेंची उपस्थिती | पुढारी

मराठा क्रांती मोर्चा : सोमवारी पुण्यात बैठक, संभाजीराजेंची उपस्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना, संस्था आणि विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती समवेत सोमवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी पुणे येथे बैठकीचे आयोजन केलेले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे पाटील, सचिन आडेकर, हनुमंत मोटे आणि हनुमंत तांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार बैठक

ही बैठक सकाळी 10 वाजता महालक्ष्मी लॉन्स, म्हात्रे पूल येथे खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेले आहे.

या बैठकीत आरक्षण संदर्भात केंद्राने १०२ च्या घटना दुरुस्तीबाबत घेतलेले निर्णय मराठा समाजाच्यासाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा आढावा त्याचबरोबर प्रस्तावित असलेल्या योजनांना गती देण्यासाठी तसेच सरकार कडून प्रलंबित असणारे विषयावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे असा संभ्रम

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे असे संभ्रम होत आहे. केंद्राच्या या निर्णयाने ओबीसी आरक्षणाचा एक अडथळा दूर होणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष ना. अशोक चव्हाण यांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्यासाठी घटना दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र या दोन्ही मुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना राज्य सरकारला कराव्या लागणार असल्याचे यावेळी कुंजीर यांनी सांगितले.

राज्याच्या ओबीसी यादीमधील सर्व जाती जमातींचे पुनर्निरीक्षण राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून करावे लागणार आहे.

त्यामुळे तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे हा प्रश्न न्यावा. त्यांनी शिफारस केल्याशिवाय सुटणार नसल्याचे धनंजय जाधव यांनी यावेळी सांगितले.

यासाठी राज्य सरकारने जी घटना दुरुस्ती ची मागणी केलेली आहे ती मागणी मान्य झाली असे गृहीत धरले तरी मराठा समाजाला आरक्षण देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आहे.

त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचे प्रतिनिधित्व मोजण्याचा जे सूत्र निश्चित केल्याचे देशभर लागू आहे ते सूत्र केंद्र व राज्याने एकत्रितरीत्या न्यायालयाकडे अर्ज करून निर्णय मागावा लागणार आहे.

या सर्व बाबीवर ९ ऑगस्टच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून आंदोलनाची पुढील भूमिका ही जाहीर केली जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.

हे ही वाचलं का? 

Back to top button