भोपाळ; पुढारी ऑनलाईन : 'तुमचं जाणं माझ्यासाठी एका शोकांतिकेपेक्षा कमी नाही, पण तुमच्याशिवाय मी एक सामर्थ्यवान मुलगी होईन…' हे शब्द आहेत मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरातील विद्यार्थिनीचे.
कोरोनामुळे आई-वडिलांना गमावलेल्या वनिषा पाठक या विद्यार्थिनीची ही कविता सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसईच्या 10 वीच्या निकालात वनिषाने 99.80 टक्के गुण मिळवले आहेत. त्यामुळेच तिच्या या यशाचे महत्त्व मोठे आहे.
वनिषाने मध्य प्रदेशचे नाव तर उंचावले आहेच, शिवाय भोपाळच्या दोन मुलींसोबत ती टॉपर बनली आहे. 16 वर्षीय वनिषा भोपाळमधील कॉर्मेल कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी आहे.
ज्यावेळी वनिषाचे मित्र परीक्षेची तयारी करत होते, त्यावेळी तिच्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला होता. आठ दिवसांच्या कालावधीत तिने आपल्या आई-वडिलांना गमावले.
आई-वडिलांना गमावल्यानंतर वनिषाने स्वतःला तुटू दिले नाही. हे दु:ख कधीही भरून न येणार होते.
पालक गमावल्याने तिचा आधारच हरपला. आई-वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. सर्वकाही गमावल्याची भावना निर्माण झाली; पण लहान भावाकडे पाहून विनिषाने सर्व दु:ख बाजूला सारले. 10 वीत चांगले गुण मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, तिने ठरवले.
वनिषा म्हणते की, मला माझ्या 10 वर्षांच्या भावाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते. कारण, आता मीच त्याची पालक आहे. वडिलांची इच्छा होती की मी आयआयटीत शिकावे किंवा आयएएस अधिकारी व्हावे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न करेन.