राजगुरुनगर (पुणे); पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेतील वादामुळे राज्यभर गाजलेल्या खेड (ता.खेड जि. पुणे) पंचायत समिती च्या शिवसेनेच्या सभापतीविरोधात विरोधी सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर १८ ऑगस्ट राेजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, दुसऱ्यांदा होणाऱ्या या मतदानाकडे तालुक्यातील नागरिकांचे तसेच राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील सहा व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे ५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यावर ३१ मेला मतदान झाले होते.
या प्रक्रियेला सभापती पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार आणि ज्योती आरगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ठराव २७ जुलैला रद्दबातल ठरविला व त्यावर पुन्हा १८ रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश दिले.
खेड तालुक्यात या अविश्वास ठरावावरून गेले दोन महिने राजकीय उलथापालथ सुरू आहे. ठरावावर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याने उत्कंठा अजून वाढली आहे.
सभापती पोखरकर यांच्याविरोधात ठराव दाखल करणारे व मतदान करणारे सदस्य गेली दोन महिने सहलीला गेले आहेत.
दरम्यान यापूर्वी झालेल्या ठराव मतदान प्रक्रियेपूर्वी सदस्य पुण्याजवळ ज्या रिसॉर्टवर थांबले होते याची माहिती पोखरकर आणि समर्थकांना मिळाली.
या माहितीनुसार, पोखरकर समर्थकांसह त्याठिकाणी गेले आणि त्यांनी सदस्य पळवण्याच्या हेतूने गोंधळ घातला.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. ते अजूनही अटकेत आहेत. तसेच तेव्हापासून राजकीय सहलीवर गेलेले बहुसंख्य सदस्यही अजूनही सहलीवरच आहेत.
अविश्वासाच्या आणि गोंधळाच्या राजकीय घडामोडीनंतर राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आरोप- प्रत्यारोपांचे तालुक्यात अक्षरशः फड रंगले होते.
शिवसेनेच्या बाजूने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राजगुरूनगर शहरात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले होते.
शिवसेनेच्या आठ पैकी सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने, पोखरकरांवरील अविश्वास ठराव मंजूर झाला.
पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत असताना देखील शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने शिवसेनेची नाचक्की झाली होती. या अविश्वासामागे आमदार मोहिते यांचा हात असल्याच्या आरोप होऊन टीका झाली होती.
तसेच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणा-या शिवसेनेच्या ६ सदस्यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जून रोजी दाखल केला.
त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या शिवसेनेच्या सहा सदस्यांपैकी एक सदस्य मच्छिंद्र गावडे हे स्वगृही आहेत.
आता पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान होताना काय घडणार? याबाबत तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
मतदान घेण्यात येणार असले तरी काही प्रशासकिय प्रक्रिया सुरू आहे. पुन्हा होणारे अविश्वास ठराव मतदान पार पडेल की नाही याबाबत सांगता येत नाही. सेना सदस्य तत्पुर्वी स्वगृही परततील अशी आशा आहे. मतभेद दुर झाले आहेत.
-शिवाजीराव आढळराव पाटील (माजी खासदार)पक्षीय राजकारण केले नाही. सभापती होताना पोखरकर यांनी सेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा सर्वांची मदत घेतली. इतरांना संधी द्यायची म्हटल्यावर नकार आला. अविश्वास ठराव संमत झाला होता. तसाच तो पुन्हा मंजुर होईल याची पूर्णतः खात्री आहे.
-दिलीप मोहिते पाटील (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, खेड)
हेही वाचलंत का?