बंदूकीचा धाक दाखवत ८७ हजारांची राेकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद | पुढारी

बंदूकीचा धाक दाखवत ८७ हजारांची राेकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

वसमत; पुढारी वृत्तसेवा :  वसमत शहरात पैसे भरण्यासाठी बँकेत जाणाऱ्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ८७ हजार रुपये पळविले. वसमत शहरात आज (गुरुवार) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या चाेरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील मालेगाव रोड भागात साई गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीचे कर्मचारी गजानन दरंगे हे बुधवारी जमा झालेली ८७ हजार रुपयांची रक्कम आज सकाळी साडेअकरा वाजता बँकेत भरण्यासाठी निघाले होते.

गॅस एजन्सीच्या खाली उतरल्यानंतर स्त्यावर दुचाकीवरुन दोघे जण आले. दाेघांनीही  तोंडाला रुमाल लावला हाेता.

दरंगे हे एजन्सीमधून खाली उतरताच दुचाकीवर आलेले दोघे त्यांच्या समोर थांबले.

एकाने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून बॅग देण्याची मागणी केली. बंदूकीच्या धाकामुळे दरंगे काहीही करू शकले नाहीत.

चोरट्यांनी बॅग घेऊन पोबारा केला. यावेळी दरंगे यांनी आरडा-ओरड केली. मात्र त्या परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक प्रकाश आवडे यांच्यासह पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.

पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता दुचाकीवर आलेल्या दोघांनी बंदूकीचा धाक दाखवून रक्कम पळविल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी नांदेड, परभणी येथे पथके पाठविली आहेत.

पाळत ठेऊन केलेला प्रकार

दरम्यान, सदर घटना पाळत ठेऊन केलेली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गॅस एजन्सीचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी बँकेत कधी जातात याची माहिती घेतली.

त्यानंतर बरोबर त्याच वेळी एजन्सीच्या जवळ थांबणे व बॅग घेऊन पळणे हा पाळत ठेऊन केलेला प्रकार असावा, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

Back to top button