अंतराळ पर्यटनाचे युग अवतरणार | पुढारी

अंतराळ पर्यटनाचे युग अवतरणार

कॅप्टन नीलेश गायकवाड

अंतराळ पर्यटनाचे स्वप्न साकार करण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या पुढे सरसावल्या असून, त्यातील एका कंपनीने प्रत्यक्ष अंतरिक्ष सहल यशस्वी केल्यामुळे आता पर्यटनासाठी अंतराळात जाण्याचे श्रीमंत व्यक्‍तींचे स्वप्न साकार होण्याच्या उंबरठ्याशी असून, ज्यांना आर्थिकद‍ृष्ट्या हे शक्य आहे, त्यांच्यासाठी अंतराळ दोन बोटांवर राहिले आहे.

आपण अंतराळात जावे, असे स्वप्न रिचर्ड ब्रॅन्सन यांनी लहानपणीच पाहिले होते आणि वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी ते पूर्ण करून दाखविले. त्यांनी त्यांची मूळ भारतीय वंशाची साथीदार, अंतरिक्ष अभियंता शिरिषा बांदला यांना खांद्यावर घेऊन आनंद व्यक्‍त केला. रिचर्ड ब्रॅन्सन हे व्हर्जिन गॅलेक्टिक या कंपनीचे मालक. त्यांच्या व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेस फ्लाईटने (युनिटी 22 अंतरिक्ष यानाने) अंतरिक्षात झेप घेऊन इतिहास रचला होता. या अंतरिक्ष वारीला एक वेगळे महत्त्व आहे. ते म्हणजे, या वारीमुळे खासगी अंतरिक्ष पर्यटनाची कवाडे खुली झाली. ब्रॅन्सन यांनी त्यांच्या सहकार्‍यांबरोबर जे उड्डाण केले, त्याला ‘सब-ऑर्बिटल’ म्हणजेच उपकक्षीय उड्डाण म्हणतात. त्यांच्या यानातच शिरिषा बांदला यांच्यासह आणखी पाचजण होते. या यानाने न्यू मेक्सिको येथून अवकाशात झेप घेतली होती. उड्डाणापूर्वी आणि नंतरही ब्रॅन्सन यांनी सांगितले की, त्यांनी लहानपणीच अंतरिक्षात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सतरा वर्षांपूर्वी त्यांनी प्रत्यक्ष अवकाशात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता आपल्याच कंपनीच्या यानातून हे स्वप्न पूर्णही केले.

‘सब-ऑर्बिटल’ म्हणजे, अंतरिक्ष प्रवासी अंतराळात पोहोचतील; मात्र पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार नाहीत. म्हणूनच या उड्डाणाला ‘उपकक्षीय’ म्हटले आहे. या प्रक्रियेत प्रवासी अंतरिक्षाच्या सीमेला स्पर्श करतो. काही मिनिटांपर्यंत ‘वजनहीन’ अवस्थेचा अनुभव घेतो म्हणजेच आपले वजन शून्य झाल्याचा भास त्याला होतो. ब्रॅन्सन यांनी 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 मध्ये ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ कंपनीची स्थापना केली होती. रॉकेट पॉवर्ड व्हीएसएस युनिटी स्पेसशिपला व्हाईटनाईट हे विमान अंतरिक्षात घेऊन गेले होते. विमानाने 50 हजार फूट जमिनीपासून 15 किलोमीटर उंचावर जाऊन युनिटी स्पेसशिपला हवेत सोडून दिले. त्यानंतर खासगी जेटच्या आकाराचे असलेल्या व्हीएसएस युनिटी स्पेसशिपचे रॉकेट इंजिन सुरू झाले. आवाजाच्या तिप्पट वेगाने 80 किलोमीटरच्या उंचीपर्यंत हे स्पेसशिप गेले. त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. स्पेसशिपमधील अंतरिक्ष प्रवासी हे अंतराळातील सुंदर द‍ृश्यांचा आनंद घेऊ लागले. काही वेळानंतर व्हीएसएस युनिटी स्पेसशिप पृथ्वीच्या दिशेने परत येऊ लागले आणि लँड झाले.

संबंधित बातम्या

अंतरिक्ष अभियंता शिरिषा बांदला अंतरिक्षात जाणार्‍या त्या तिसर्‍या भारतीय वंशाच्या अंतराळ वीरांगना ठरल्या. यापूर्वी कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी अंतरिक्षाची सफर केली होती. अर्थात, भारताचा नागरिक म्हणून अंतरिक्ष सफर करणारे एकमात्र अंतराळवीर म्हणजे विंग कमांडर राकेश शर्मा. सोव्हिएत रशियाच्या ‘इंटर कॉसमॉस’ कार्यक्रमांतर्गत सोयूज-टी 11 या यानातून 3 एप्रिल 1984 रोजी त्यांनी अंतरिक्षात भरारी घेतली होती. ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ यानाच्या भरारीमध्ये एकूण सहा अंतराळ प्रवाशांचा समावेश होता. यातच समाविष्ट असलेल्या शिरिषा बांदला यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला. ह्यूस्टनमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. बांदला चार वर्षांच्या होत्या तेव्हा अमेरिकेत गेल्या. 2011 मध्ये पर्डे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एरॉनॉटिक्समधून त्यांनी विज्ञानातील पदवी संपादन केली. तसेच जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून 2015 मध्ये एमबीएची पदवी घेतली.

व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचा मूळ हेतू या योजनेमुळे सफल झाला आणि आता कंपनीकडून अंतरिक्ष पर्यटनास प्रारंभ केला जाणार आहे. पुढील वर्षीच कंपनी पर्यटकांना अंतराळात पाठविण्यास सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी कंपनी आणखी तीन चाचणी उड्डाणे करणार आहे. या चाचण्या याचवर्षी होतील. कंपनीने आगाऊ बुकिंगसुद्धा सुरू केले असून, अंतरिक्ष पर्यटनासाठीची तब्बल 600 तिकिटे यापूर्वीच विकली गेली आहेत. अंतरिक्षात पर्यटनासाठी जाण्यास इच्छुक असलेले हे पर्यटक वेगवेगळ्या 60 देशांमधील आहेत. त्यासाठी या पर्यटकांनी दोन लाख ते अडीच लाख डॉलर्स एवढा खर्चही केला आहे. पैसा खर्च करण्याची तयारी असलेले पर्यटक किती मोठ्या संख्येने अंतरिक्षात जाऊ इच्छितात. त्यामुळेच कंपनीने व्यावसायिक तत्त्वावर उड्डाणे सुरू झाल्यानंतर दरवर्षी अशा प्रकारची तब्बल 400 उड्डाणे करण्याची योजना तयार केली आहे.

रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यानंतर अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस हे ‘ब्लू ऑरिजिन’च्या ‘न्यू शेपर्ड’ यानातून अवकाशात झेपावले. तेही उड्डाण यशस्वी झाल्याने अंतराळ पर्यटनाच्या आकांक्षेला आणखी धुमारे फुटले आहेत. जगभरात आर्थिक उदारीकरणामुळे असंख्य अब्जाधीश निर्माण झाले. या सर्व अब्जाधीशांमध्ये अंतरिक्षात फिरायला जाण्याची स्पर्धा लागली आहे. जेफ बेजोस यांनी 20 जुलै रोजी ब्लू ऑरिजिनच्या ‘न्यू शेपर्ड’ यानातून अंतराळ प्रवास करण्याच्या योजनेची घोषणा केली होती. वस्तुतः जेफ बेजोस हे अंतरिक्षात जाणारे पहिले अब्जाधीश ठरले असते; परंतु लहानपणापासूनच अंतराळात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गेली 17 वर्षे अविरत प्रयत्न करणार्‍या रिचर्ड ब्रॅन्सन यांनी या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला.

या सर्व घडामोडींना आणखी एक पैलू आहे. अंतरिक्ष प्रवास ही सरकारच्या नियंत्रणाखालील गोष्ट होती, ती हळूहळू खासगी क्षेत्राकडे चालली आहे. खासगी कंपन्या जगभरात व्यवसाय करून मोठ्या झाल्या आहेत आणि आता त्या अंतरिक्ष सफरीच्या क्षेत्रात सरकारी क्षेत्राची मक्‍तेदारी मोडण्यास तयार आहेत. नासाचा स्पेस शटल प्रोग्राम 2012 मध्येच संपला. म्हणजे नासाचे सर्व स्पेस शटल निवृत्त झाले. अशा स्थितीत नासाने अंतरिक्ष पर्यटकांना अंतराळात नेण्याचे ठरविले तर नासालाही खासगी कंपन्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. स्पेस एक्स ही अ‍ॅलन मस्क यांची कंपनीही बरीच वर्षे या दिशेने कार्यरत आहे. 2025 पर्यंत स्पेस-एक्सची स्थिती बरीच सुधारलेली असेल आणि हजारो श्रीमंतांना दरवर्षी अंतराळ वारी करण्यास कंपनी सज्ज झालेली असेल, असे मस्क यांनी म्हटले होते. ओरायन स्पान नावाच्या कंपनीने 2022 पर्यंत अंतरिक्षात हॉटेल लाँच करण्याची योजना आखली आहे. 2023 पर्यंत या हॉटेलमध्ये पाहुण्यांचे स्वागत करायला कंपनी तयार असेल, असे सांगितले जात आहे. गेटवे फाऊंडेशन नावाच्या कंपनीला 2025 पर्यंत थेट चंद्रावरच हॉटेल बांधण्याची इच्छा आहे. एकंदरीत अंतरिक्ष हे मानवी हस्तक्षेपाचे एक नवे क्षेत्र ठरण्यासाठी सज्ज झाले आहे.

Back to top button