न्यायाधीशांच्या रिक्त पदांसाठी नावे पाठवण्याचे सरन्यायाधीशांचे आवाहन! | पुढारी

न्यायाधीशांच्या रिक्त पदांसाठी नावे पाठवण्याचे सरन्यायाधीशांचे आवाहन!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: न्यायाधीशांच्या रिक्त पदे भरण्यासाठी लवकरात- लवकर पदोन्नती करण्यासाठी नावे पाठवण्याचा आग्रह देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केला. विविध उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संमेलनाला संबोधित करताना सरन्यायाधीशांनी हे आवाहन केले.

विशेष म्हणजे, सहा वर्षांनी अशाप्रकारचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. न्यायालयातील रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीसाठी नावांची शिफारस करण्याच्या प्रक्रियेत वेग आणण्याचा आग्रह यापूर्वी देखील सरन्यायाधीशांकडून करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला प्रतिसाद बराच उत्साहवर्धक आहे. उच्च न्यायालयाने गेल्या एक वर्षांहून कमी कालावधीत सामूहिक प्रयत्नांनी १२६ नियुक्त्या केल्या आहेत. तर अजून ५० नियुक्त्या होण्याची शक्यता असल्याचे रमन्ना यांनी व्यक्त केले. संपूर्ण सहकार्य तसेच संस्थेप्रती प्रतिबद्धतेमुळेच हे शक्य होवू शकणार आहे. अद्यापही मोठ्या संख्येत अजून रिक्त पदे असल्यामुळे लवकरात- लवकर पदोन्नतीसाठी नावे पाठवावीत, असे ते यावेळी म्हणाले.

गेल्या एका वर्षात सर्वोच्च न्यायालयात नऊ न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयांकरीता १० नवीन मुख्य न्यायाधीश मिळाले आहे. कॉलेजिमयमधील सहकार्यांबद्दल सरन्यायाधीशांनी आभार मानले. गेल्या आठवड्यात देखील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना सीजेआय यांनी उच्च न्यायालयातील रिक्त पदांना भरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button