Umran Malik Story : फळ विक्रेत्याचा मुलगा असा झाला ‘वेगवान गोलंदाज’, जाणून घ्या उमरान मलिकची कहाणी

Umran Malik : आयपीएलच्या इतिहासात ठरला दुसरा वेगवान गोलंदाज, उमराने रचला इतिहास
Umran Malik : आयपीएलच्या इतिहासात ठरला दुसरा वेगवान गोलंदाज, उमराने रचला इतिहास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Umran Malik Story : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिक उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. उमरानने बुधवारी (२७ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध ५ विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीनंतर उमरानची सर्वत्र चर्चा होत असून आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या आगामी स्पर्धांसाठी त्याला भारतीय संघात समाविष्ट करण्याची मागणी देशपातळीवरील राजकीय नेत्यांसह चाहते करत आहेत.

२२ वर्षीय उमरान मलिकसाठी आयपीएलपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत त्याला क्रिकेटचे स्पेशल कोचिंग मिळाले नाही. तसेच तो लेदर बॉलने क्रिकेटही खेळला नव्हता. या वयापर्यंत, उमरान 'मोहल्ला' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळत असे. तो लोकल स्टार क्रिकेटर होता. स्थानिक स्पर्धांमधून त्याची ५०० ते ३००० रुपयांपर्यंत कमाई व्हायची. (Umran Malik Story)

रणधीर मनहास यांच्यासोबतची ती भेट…

२०१७ मध्ये, उमरानने जम्मू आणि काश्मीरमधील मौलाना अबुल कलाम स्टेडियममध्ये सुप्रसिद्ध स्थानिक प्रशिक्षक रणधीर मन्हास यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राज्याचा अनुभवी फलंदाज जतीन वाधवन नेटमध्ये फलंदाजी करत होता. उमरान रणधीर यांना म्हणाला, 'सर, मला गोलंदाजी करू द्याल का?' खूप मनधरणी केल्यानंतर रणधीर मन्हास यांनी त्याला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली. त्या दिवशी चपलाशिवाय गोलंदाजी करताना उमरानने जतीन वाधवनला भेदक मारा करत चकवले. जतीन त्याची आग ओकणारी गोलंदाजी पाहून चकीत झाला. उमरानचे टॅलेंट पाहून रणधीर मन्हास खूप प्रभावित झाले. (Umran Malik Story)

मनहास म्हणतात…

जम्मू जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक रणधीर मनहास सांगतात, 'मी उमरानला सांगितले की, ज्या दिवशी तू राष्ट्रीय स्तरावर खेळशील, त्या दिवशी तुला मागे वळून पाहावे लागणार नाही. त्यामुळे गंभीर हो. मी त्याला अंडर-१९ प्रशिक्षणासाठी पाठवले होते, जिथे त्याने शूज उधार घेत गोलंदाजी केली. त्याची कूचबिहार करंडक स्पर्धेसाठी निवड झाली. परंतु त्याला फक्त ओडिशाविरुद्ध पावसाचा फटका बसलेला सामना खेळायला मिळाले. (Umran Malik Story)

एक मनोरंजक घटना सांगताना मनहास म्हणतात, 'उमरान एके दिवशी स्टेडियममध्ये होता आणि आसाम संघाला सरावासाठी नेट गोलंदाजांची गरज होती. अजय रात्रा यांनी उमरानला नेटमध्ये गोलंदाजी करशील का? असे विचारले. उमरानने लगेच होकार दिला पण १५ मिनिटांनंतर आसामच्या प्रशिक्षकाने उमरानला एका सामन्यात भाग घ्यायचा असल्याने थांबण्यास सांगितले. रात्रा यांना दुखापत होऊ नये असे वाटत होते.' (Umran Malik Story)

उमरान नदीकाठावर धावत असे

उमरानच्या बाबतीत, हे जाणून आश्चर्य वाटेल की सनरायझर्स हैदराबादमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो जिमच्या सत्रांचा भाग नव्हता. प्रत्यक्षात उमरान याचे घर तवी नदीजवळ असून नदीकाठचा परिसर प्रामुख्याने वालुकामय आहे. उमरान वालुकामय मैदानावर धावत आणि क्रिकेट खेळत लहानाचा मोठा झाला. त्यामुळे त्याचे शरीर खूप मजबूत झाले. त्याच्या यॉर्कर्सचे श्रेय तो टेनिस बॉल क्रिकेटला देतो.

उमरानचे वडील करतात 'हे' काम…

उमरानचे वडील अब्दुल मलिक हे फळ आणि भाजीपापा विक्रेते आहेत. त्यांचे छोटे दुकान आहे. उमरानने चार वर्षांपूर्वी गुजर नगर येथील काँक्रीटच्या खेळपट्टीवर कारकिर्दीला सुरुवात केली. उमरान अधूनमधून रात्री टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला गेले की अब्दुल मलिक आपल्या मुलाच्या मागे जायचे. कारण उमरान कुठेतरी चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती त्यांना वाटत होती.

उमरानचे वडील अब्दुल मलिक एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'हे वय कसे असते हे आम्हाला माहीत आहे. अमली पदार्थांचे सेवन करून आयुष्य उद्ध्वस्त करणारे अनेक तरुण आहेत. मी काळजीत होतो. पण त्याने (उमरान) आम्हाला आश्वासन दिलं की त्याला फक्त क्रिकेटची नशा आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी काळजी करण्याची गरज नाही.

SRH संघात अशी झाली एन्ट्री..

गेल्या मोसमात टी. नटराजनच्या दुखापतीनंतर उमरान मलिकचा सनरायझर्स हैदराबाद संघात समावेश करण्यात आला होता. उमरानच्या सामील होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. वास्तविक, अब्दुल समदने उमरानच्या गोलंदाजीचे व्हिडिओ व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टॉम मूडी यांना पाठवले होते. सनरायझर्सला त्याचे व्हिडिओ आवडले आणि पुढे काय घडले हे सर्वांनाच माहिती आहे. अब्दुल समद देखील काश्मीरचा आहे आणि सध्याच्या आयपीएलमध्ये सनरायझर्सचा एक भाग आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news